बाजारबंदीमुळे अर्थकारणाला खीळ

कोरेगाव भीमातील व्यावसायिक आर्थिक संकटात

उदयकांत ब्राह्मणे
कोरेगाव भीमा (पुणे) – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक ठिकाणच्या बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु करोना रुग्ण कमी झाले आणि परीस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार हॉटेल, सिनेमागृह, नाट्यगृह, मंदिरे सुरू करण्यात आली. पण कोरेगाव भीमा येथील आठवडे बाजार बंद असल्याने येथील अर्थकारणाला खीळ बसली आहे. लॉकडाऊन आणि बाजारबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यावसायिकांकडून बाजार सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.

कोरेगाव भीमा येथील अनेक शेतकरी, छोटे-मोठे व्यवसायिक आठवडे बाजारावर अवलंबून आहेत. मात्र, आठवडेबाजार बंद ठेवल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. बाजाराशी निगडित असणाऱ्या नागरिकांचे अर्थकारण कोलमडले आहे. पुन्हा करोना रुग्णसंख्येत होणारी वाढ यामुळे अनेक गावांनी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. तर गावोगावी फिरुन किंवा रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री करावा लागत आहे. आठवडेबाजार सुरू होऊन दिलासा मिळेल अशी आशा येथील नागरीकांना होती. हातावरचे पोट असलेल्या व कमवू तेव्हा खाऊ अशा नागरीकांचे हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे येथील व्यवसायिक आठवडे बाजार सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी आठवडे बाजारात खरेदी विक्री करत आपला उदरनिर्वाह करतात. तसेच कोरेगाव भीमा येथे भरणाऱ्या गुरुवारच्या आठवडे बाजारात वढू बुद्रूक, आपटी, वाजेवाडी, डिंग्रजवाडी, शेरी, धानोरे, सणसवाडी, पेरणेगाव, डोंगरगाव, बुर्केगाव, वढू खुर्द येथील नागरिक खरेदीसाठी येतात. बाजाराच्या दिवशी शेतकरी व व्यापारी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. फळ दुकानदार, मसाला व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते अशा अनेक घटकांचा उदरनिर्वाह आठवडेबाजारावर अवलंबून आहे. मार्च महिन्यापासून देशभरात करोनामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ, आठवडेबाजार बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यामुळे गावोगावी भरणारे आठवडेबाजार सात महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे परिसरातील व्यवसायिक, शेतकरी हतबल झाले आहेत.

  • वर्षभराच्या उलाढालीवर फिरले पाणी
    करोनाचे संकट जिवावर बेतू नये, त्याचा संसर्ग होऊ नये, यासाठी गावागावात ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न करण्यात आला. धान्य, कपडे, पादत्राणे, किराणा, मसाले, भाजीपाला, फळे, भेळभत्ता याबरोबर इतर व्यावसायिक आपली दुकाने लावतात यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. परंतु यंदा करोनामुळे यंदा वर्षभराच्या उलाढालीवर पाणी फिरले आहे.

आम्ही कुटुंबीय भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत आहोत. करोनामुळे आठवडे बाजार बंदचा मोठ्या प्रमाणात फटका आम्हाला बसला आहे. भाजी विकूनच आमचा उदरनिर्वाह चालतो. बाजार सुरू झाल्यावर उत्पन्नात भर पडते. त्यामुळे आमचा संसार चालतो. प्रशासनाने आमची दखल घेऊन आठवडे बाजार सुरू करण्याची गरज आहे.
 सैना गायकवाड, भाजी विक्रेते कोरेगाव भीमा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.