वाई, दि. 26 (प्रतिनिधी)- करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वाई शहराच्या मुख्य वस्तीमध्ये भरणारा आठवडे बाजार काही दिवसासाठी बंद ठेवण्याचा आदेश वाई प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी पारित केला आहे.
वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी वाई प्रांत कार्यालयास दिलेल्या लेखी पत्रानुसार वाई शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पुढील काही दिवस वाई शहरात दर सोमवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.
मुख्याधिकारी पोळ यांनी प्रशासनाच्या माध्यमातून करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्व्हेनुसार शहराच्या मुख्य मध्यवर्ती ठिकाणी दर सोमवारी भरवल्या जाणाऱ्या आठवडे बाजारादिवशी खरेदी विक्रीसाठी विविध भागांतून ग्राहक व व्यापारी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
बाजारपेठेत जवळपास 500 ते 600 व्यापारी व शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी आणतात. तो खरेदी करण्यासाठी त्याच्या काही पटीने नागरिक गर्दी करतात. परंतु, यादरम्यान कोणीही करोना संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे वाईचा आठवडे बाजार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.