सुएझ (इजिप्त), – सुएझ कालव्यात रुतून बसलेल्या मालवाहू जहाजामुळे या सागरी मार्गातील वाहतूक आज् सलग पाचव्या दिवशीही खोळंबलेलीच आहे. रुतून बसलेले जहाज सोडवण्याचे प्रयत्न अव्याहतपणे सुरू आहेत. त्याबरोबरच सुएझ कालव्यातून होणाऱ्या सागरी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग खुला करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
पनामा ध्वज असलेले हे मालवाहू जहाज मंगळवारी सुएझ कालव्यातील वाळूमध्ये रूतून बसले अणि त्यामुळे या अरुंद कालव्यातील सागरी वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे.
“एव्हर गीव्हन’ या जहाजाचे व्यवस्थापन बघणाऱ्या बर्नार्ड स्च्युलेट शीपमॅनेजमेंट् कंपनीकडून या जहाजाला सोडवण्याचे प्रयत्न अपयशी ठरत असल्याचे सांगण्यात आले. या जहाजाच्या खालच्या कक्षांमध्ये पाणी घुसले असून ते पंपांद्वारे उपसण्यात येऊ लागले आहे. हे जहाज हटवण्याच्या कामात आणखी दोन टग बोटी रविवारी सहभागी होतील. त्यानंतर या कामाला गती मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.
या जहाजाला वाळूतून सोडवण्यात मदत करण्यासाठी कमीतकमी 10 टगबोट तैनात करण्यात आल्या आहेत, असे कंटेनर जहाजाची मालकी असणारी जपानी फर्म शोएई किसेन केकेने म्हटले आहे.
या अडकलेल्या जहाजामुळे सुएझ कालव्याच्या बाहेर किमान 280 जहाजे आणि नौका खोळांबून राहिल्या आहेत. काही नौकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करायला सुरुवात केली असून काही जहाजे आता दूरच्या मार्गाने जाण्याच्या तयारीत आहेत. सुएझ कालवा वाहतुकीसाठी बंद होण्याने सागरी मार्गातील दूरच्या प्रवासासाठी इंधन आणि वेळेचा मोठा अपव्यय होण्याची शक्यता आहे.