‘कॉम्बॅट’ संकेतस्थळाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध
पुणे – राज्यातील समुद्री भागात आढळणारे विविध प्रजातीचे मासे, समुद्री वनस्पती, कांदळवने, खारफुटी वने आणि विविध जलचर यांची सविस्तर माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या संस्थेने राज्यातील सागरी जैवविविधतेची नोंदवही तयार केली असून, संस्थेच्या “कॉम्बॅट’ संकेतस्थळावर ती उपलब्ध आहे.
राज्याला 720 किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. येथील जैवविविधता नोंदविण्याचे काम “बीएनएचएस’ गेल्या काही वर्षांपासून करत आहे. याच माहितीच्या आधारावर संस्थेने कोस्टल ऍन्ड मरीन बायोडायव्हर्सिटी असिसमेंट टूलची (कॉम्बॅट) निर्मिती केली असून या संकेतस्थळामध्ये महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यांवरील जीवांची आणि विविध अधिवासांची विस्तृत नोंद केली आहे.
या उपक्रमांतर्गत सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रातील समुद्री जैवविविधतेच्या दृष्टीने सात महत्त्वाच्या क्षेत्रांचा शोध घेण्यात आला. या जागा निवडताना समुद्री कासवांची विणी, वाळूचे किनारे, कायद्याने संरक्षित सागरी प्रजातींचा वावर, समुद्री गवत किंवा प्रवाळ याबाबींचा विचार केला.
या माध्यमातून पालघर ते ठाणे, काशीद ते आक्षी, वेळास ते दिघी, गुहागर ते दाभोळ, रत्नागिरी ते जयगड, देवगड-विजयदुर्ग-कशेळी आणि वेंगुर्ला-मालवण-आचरा, अशी सात महत्त्वाची सागरीक्षेत्र अंतिम केली. त्यानंतर किनाऱ्यांच्या अनुसार या क्षेत्राची छोट्या भागांमध्ये विभागणी करून तेथील जैवविविधता नोंदवली. सामान्य नागरिक, संवर्धक आणि किनाऱ्यालगत होणाऱ्या विकासासंबंधी निर्णय घेणाऱ्या सरकारी संस्थांना या संकेतस्थळाचा उपयोग होणार आहे.