नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत रजतपदक पटकावणाऱ्या पोलंडच्या मारिया आंद्रेजिकने एका लहान मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी आपल्या पदकाचा लिलाव केला आहे.
तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 64.61 मीटर लांब भाला फेकताना महिला गटात रजतपदक जिंकले होते. मुळातच कर्करोगावर यशस्वी मात करत तिने या स्पर्धेत भाग घेतला होता. आता याच स्पर्धेतील पदकाचा लिलाव एका अशा मुलासाठी तिने केला आहे की त्याला ती ओळखतही नाही.
मारियाला 2016 सालच्या रियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मारियाने एका आठ महिन्याच्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी स्वत:च्या पदकाचा लिलाव केला. या लिलावात एका कंपनीने हे पदक 92.90 लाख रुपयांना खरेदी केले.
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड रुग्णालयात 8 महिन्याच्या मिलोश्चक मलीसा या मुलावर उपचार सुरू आहेत. या उपचारासाठी 2.86 कोटी रुपयांची गरज आहे. स्वत:च्या पदकाचा लिलाव केल्यानंतर मारियाने सोशल मीडियावरून अनेकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनही केले आहे