बुधवारी देवपूजन, नगरप्रदक्षिणा, सीमोल्लंघन : उत्सवाचे बैठकीत नियोजन
जेजुरी – कुलदैवत खंडेरायाचा पालखी सोहळा सालाबादप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. 5) सायंकाळी 6 वाजता मल्हार गडकोट आवारातून देवभेट, आपटापूजन, नगरप्रदक्षणा, सीमोल्लंघन आदी सोहळ्यासाठी प्रस्थान ठेवणार आहे. मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याचे सुमारास जयाद्री डोंगर रांगेच्या कुशीत (रमणा परिसर) फटाक्यांच्या आतषबाजीत देवभेट होणार आहे. त्यानंतर आपटापूजन, नगरप्रदक्षणा करून गुरुवारी (दि. 6) सकाळचे सुमारास पालखी सोहळा गडावर दाखल झाल्यानंतर खंडास्पर्धेला सुरुवात होणार असल्याचे प्रमुख वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे, खोमणेपाटील ,माळवदकरपाटील यांनी जाहीर केले.
जेजुरीच्या खंडेराया आणि त्यांच्या मानपानाच्या महत्वपूर्ण मर्दानी दसरा उत्सवाची नियोजनाची बैठक रविवारी (दि.2) ऐतिहासिक मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर येथे पार पडली. यावेळी प्रमुख वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे, माजी अध्यक्ष गणेश आगलावे, रोहिदास माळवदकर पाटील, संतोष खोमणेपाटील, सचिन खोमणे, रामभाऊ माळवदकर, पंडित हरपळे, योगेश खाडे, माजी विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, माऊली खोमणे, दिलावर मनेर, सुभाष राऊत, सुशील राऊत, गणेश डीखळे, बुवा थोरात, जाफर पानसरे,
अशोक खोमणे, ओंकार झगडे, अविनाश झगडे, माजी नगरसेवक अजिंक्य देशमुख, किरण राऊत, जालिंदर खोमणे, छबन कुदळे, कृष्णा कुदळे, दिलीप मोरे, मंगेश शेवाळे, अंकुश शेवाळे, माजी विश्वस्त सुधीर गोडसे, कडेपठार देवसंस्थानचे विश्वस्त रामचंद्र दिडभाई, मार्तंड देवसंस्थान विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे, पंकज निकुडे पाटील, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे ,तसेच ग्रामस्थ -खांदेकरी मानकरी, सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाच्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थ खांदेकरी मानकरी ,सेवेकरी यांचा उचित सन्मान करण्यात येणार असून पालखी मार्गाची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. तसेच विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. खंडास्पर्धक विजेत्यांना यंदा रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येऊन त्यांच्या कुटुंबीया समवेत सत्कार करण्यात येणार आहे. पालखी सोहळा गडावर दाखल झाल्यानंतर अन्नसेवा कक्षात ग्रामस्थ -मानकरी यांच्या अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे देवसंस्थानच्या वतीने सांगण्यात आले. आभार छबन कुदळे यांनी केले.
ग्रामस्थ मंडळाच्या अध्यक्षपदी जालिंदर खोमणे
ग्रामस्थ खांदेकरी ,मानकरी मंडळाच्या अध्यक्षपदी खंडोबा देवाचे नित्य सेवेकरी जालिंदर खोमणे यांची एकमताने निवड करण्यात आली.