मार्च महिना ठरला सर्वाधिक घातक

वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद : नागरिकही गांभीर्य विसरले

पिंपरी – करोनाच्या उत्पत्तीपासून पिंपरी-चिंचवड शहरासाठी मार्च महिना सर्वाधिक घातक ठरल्याचे आज स्पष्ट झाले. वर्षभरातील सर्वाधिक बाधित रुग्णांची नोंद याच महिन्यात झाली असून, तब्बल 34 हजार 434 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 226 जणांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये बाधित होण्याचा वेग अधिक होता. त्या वेळी 28 हजार 62 जणांना करोनाची लागण झाली होती. तर 424 जणांचा मृत्यू झाला होता. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तुलनेमध्ये मृतांची संख्या मात्र कमी आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना गतवर्षीएवढे गांभीर्य नागरिकांमध्ये नसल्याचेही समोर येत आहे.

मार्च 2020 मध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर लॉकडाऊनच्या मार्च ते मे महिन्याच्या काळात शहरातील रुग्णसंख्या आटोक्‍यात होती. मात्र, जून महिन्यामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शहरातील बाधितांमध्ये वाढ होऊ लागली. त्यामध्ये जुलै ते ऑक्‍टोबर या महिन्यांमध्ये करोनावाढीचा वेग सर्वाधिक राहिला. जून महिन्यामध्ये 3,214, जुलै 20,246, ऑगस्ट 28,062 तर सप्टेंबर महिन्यामध्ये 26,454 जणांना करोनाची लागण झाली होती.

त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून शहरातील बाधितांचे प्रमाण कमी होऊ लागले. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शहरात पुन्हा करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला सुरुवात झाली. फेब्रुवारी महिन्यामध्ये शहरात 3,555 जणांना करोनाची लागण झाली तर 40 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मार्च महिन्यामध्ये मात्र आश्‍चर्यकारक आणि वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची भर पडली. या महिन्यामध्ये तब्बल 34 हजार 434 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 226 जणांचा मृत्यू झाल्याने शहरातील करोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनत असल्याचे समोर आले आहे.

बुधवारी विक्रमी नोंद
शहरामध्ये बुधवारी (दि. 31) करोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा नवा उच्चांक गाठला. आज दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 2,288 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 108 रुग्णांची नोंद झाली. तसेच दिवसभरात 18 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामध्ये शहरातील 15 तर शहराबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील भोसरी, चिखली, पिंपळे गुरव, चिंचवड, थेरगाव, पिंपरी, यमुनानगर, काळेवाडी, निगडी, रहाटणी येथील 15 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर शहराबाहेरील खडकी, राजगुरुनगर व काळकुटी येथील 3 जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरामध्ये 1410 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 20 हजार 322 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 5,211 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1729 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.