पुणे(प्रतिनिधी) – शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे पुत्र आणि युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर खूनासाठी हत्यारे पुरविणाऱ्या चंद्रशेखर रामदास वाघेल (वय 32, मुकुंदनगर) याला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्याने सनी कोलते याला हत्यारे पुरवली होती. त्यासाठी दहा हजार रुपये घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान, वाघेल याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी वाघेल याविरोधात यापुर्वी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो शस्त्र पुरवठा करण्यामध्ये सराइत असून संघटीत गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे त्याने कोठुन मिळविली. त्याची व सनी याची ओळख कशी झाली याबाबत त्याकडे सखोल तपास करायला असल्याने पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील एस.ए. क्षीरसागर यांनी केली.
शुक्रवारी (दि. 2) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास बुधवार पेठेतील गवळी आळी समोरील रस्त्यावर घडलेल्या घटनेप्रकरणात यापुर्वी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तर, एक जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या राजकीय वादाच्या कारणावरून राग मनात धरून अटक आरोपी व त्याच्या साथीदारांनी दिपक मारटकर यांची धारदार हत्याराने वार करत गंभीर जखमी करून खून केल्याची फिर्याद राहुल भगवान आलमखाने (वय 43, रा. गवळी आळी, बुधवार पेठ) यांनी दिली आहे.