छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठवाड्याच्या पाणीसाठ्यावरून कायम चिंता व्यक्त करत असताना हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण गणेशपुजनाला १०० टक्के भरले आहे. यामुळे यंदा मराठवाड्याची तहान भागणार आहे. मराठवाड्यातील बहुतांश धरणे भरली असली तरी राज्याच्या तुलनेत ६५.३५ टक्के धरणे भरली आहेत. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी जायकवाडी धरणात ३२.६९ टक्के पाणीसाठा होता. आता धरण १०० टक्क्यांनी भरले आहे.
बीड जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीची नोंद झाली होती. आता माजलगाव धरणात २८ टक्के आणि मांजरा धरणात ७१.६६ टक्के पाणीसाठा आहे. काही दिवसांपूर्वी शुन्यावर असणारं माजलगाव धरण एका दिवसाच्या पावसात थेट १८ टक्क्यांवर गेले होते. हिंगोली सिद्धेश्वर धरणही फुल्ल झाले असून मागच्या वर्षी ४५.९३ टक्के पाणी भरले होते. येलदरी धरण ६५ टक्के भरले असून हिंगोलीत पूर आल्यानंतर आता हिंगोलीतील दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
नांदेडचे विष्णूपुरी धरण ९१.४७ टक्के आणि निम्न मनार धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली असून निम्न तेरणा ६७ टक्के तर लातूरच्याही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे जलसंपदा विभागाने नोंदवले आहे. परभणीच्या निम्न दुधना धरणात ७४.६७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
जोरदार पावसाची शक्यता
मागील आठवडयात झालेल्या पावसाने मराठवाड्यात नागरिकांची दाणादाण उडाली होती. हजारो हेक्टरवरील शेती पाण्यााखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला असून त्यानंतर हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.