विदर्भासह मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा

जालना, अमरावती, बुलडाण्यात पिकाचे मोठे नुकसान

मुंबई – विदर्भासह मराठवाड्याला आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याने काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि घनसांगवी तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. भोकरदन तालुक्‍यातल्या पारध, रेणुकाई पिंपळगाव गावात रात्रीच्या सुमारास गारा पडल्या. दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तसेच बुलडाणा जिल्ह्यालाही अवकाळी पावसाने झोडपले आहे.

अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री अवकाळी पाऊस पडला. कालपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्‍यात अनेक भागात रात्री 2 वाजता विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे गहू, हरभरा, आंबा, कांदा, संत्रा पिकांचे नुकसान होण्याची जास्त शक्‍यता आहे. तर गारपिटीने गहू आणि हरभऱ्याबरोबरच मोसंबीच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे फळबागांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

रायगडमध्ये धुक्‍याची दाट चादर
रायगड जिल्ह्यातील उरण परिसरावर आज सकाळपासूनच धुक्‍याची दाट चादर पसरली आहे. यामुळे काही परिसरात 50 ते 60 फुटांच्या अंतरावरचे दिसणे देखील कठीण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. रायगड जिल्ह्यात देखील हा पारा किमान 9 अंशावर गेला होता. दरम्यान आज सकाळपासून उरण परिसरात धुक्‍याची दाट चादर पसरली आहे. यामुळे, उरण शहर आणि आसपासच्या परिसरातील गावांवर मोठ्या प्रमाणात धुके दिसून आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)