फलटण – येथील जोशी हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटरच्यावतीने जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त शनिवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. मॅरेथॉनला सजाई गार्डन मंगल कार्यालयापासून प्रारंभ होणार असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
जोशी हॉस्पिटल गेल्या पाच वर्षांपासून जागतिक अस्थिरोग दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. यावषी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. सौ. मंदाकिनी आमटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मन आणि शरीर निरोगी राहण्यासाठी योग्य आहार व व्यायाम आवश्यक आहे. देशाच्या जडणघडणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने युवा पिढी सशक्त असली पाहिजे. जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनामागे हाच हेतू असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी स्पष्ट केले.
25 ते 45 वर्षे वयोगटातील सर्वांना व्यायामाचे महत्त्व समजावून देण्यासाटी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. फलटण येथे गेल्या 18 वर्षांपासून अस्थिरोग उपचार, सांधेरोपण आणि मणक्यांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. सर्व रुग्ण आमच्या कुटुंबाचाच भाग असल्याचे समजून 12 आक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता सजाई गार्डन येथून दहा किमी अंतराच्या, 6.30 वाजता पाच किमी मॅरेथॉनला तर 7 वाजता तीन किमी वॉकेथॉन (जलद चालणे) सुरू होणार आहे.
मॅरेथॉन स्पर्धेसाठी सळसळता युवा गट (वय 20 ते 40) आणि प्रगल्भ प्रौढ गट (वय 41 ते 60) तर तीन किमी वॉकेथॉनसाठी अनुभवी ज्येष्ठ (60 वर्षांवरील) असे वयोगट आहेत. मॅरेथॉन संपल्यानंतर सकाळी 9 वाजता सजाई गार्डन कार्यालया अल्पोपहार, 10 वाजल्यापासून मुख्य कार्यक्रम सुरु होणार असून दुपारी 1 वाजता भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. सजाई गार्डनमधील कार्यक्रमासाठी प्रवेश पास आवश्यक आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी दि. 30 सप्टेंबरपर्यंत 200 रुपये प्रवेश फी भरुन ऑनलाइन नोंदणी करावी. ज्येष्ठ नागरिकांना फी आकारली जाणार नसल्याचे डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सांगितले.