-उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन – कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
नांदेड – विद्यार्थीहित लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्याकरिता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मॅरेथॉन बैठका आणि कार्यशाळा घेण्यात येत आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रातील प्राचार्यांच्या कार्यशाळेनंतर आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चारही जिल्ह्यातील शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दिली.
गेल्या आठवड्यात विद्यापीठ परिक्षेत्रातील प्राचार्यांची बैठक कुलगुरू डॉ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीत कुलगुरूंनी प्राचार्यांना या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ‘रोडमॅप’ तयार करण्याचे निर्देश दिले होते. या बैठकीपाठोपाठ सोमवारी (दि. २६) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक संकुल, लातूर व परभणीचे उप-परिसर आणि हिंगोलीच्या न्यू मॉडेल डिग्री कॉलेजच्या शिक्षकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कुलगुरूंनी नवीन शिक्षण धोरण राबविण्याकरिता करावयाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, आय.क्यू.ए.सी. विभागाचे संचालक डॉ. डी. डी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रम हे बहुआयामी, दर्जेदार व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याच्या दृष्टीने तयार केला पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. यासाठी अभ्यासक्रमात अमुलाग्र बदल करण्यात यावा, असे करताना विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, उद्योगक्षेत्रातील मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील जाणकार आणि विद्यार्थी यांच्या मतांचा आदर करण्यात यावा, अशा सूचनाही कुलगुरूंनी केल्या आहेत. यापुढे प्रत्येक अभ्यासक्रमाचा उद्देश आणि अपेक्षा काय आहेत? याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश विद्यापीठ अभ्यास मंडळास दिले. केवळ अभ्यास मंडळाच्या सदस्यांनीच हा आराखडा तयार करायचा नसून त्यामध्ये सर्व शिक्षकांनी सहभाग घ्यायचा आहे आणि व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम निर्माण केला पाहिजे, अशी अपेक्षा देखील कुलगुरूंनी व्यक्त केली.
नवीन शिक्षण धोरण विद्यापीठात प्रभावीपणे राबविण्याकरिता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चारही ठिकाणी शिक्षकांसाठी प्रशिक्षण व कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. नांदेड येथील यशवंत महाविद्यालय, हिंगोलीच्या आदर्श महाविद्यालयात आणि दयानंद महाविद्यालय, लातूर तर परभणीची कार्यशाळा श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित केली जाणार आहे. या कार्यशाळेत विविध तज्ज्ञ नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयी मार्गदर्शन, माहिती तथा सूचना करणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम या प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून होणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून उच्च शिक्षण सचिव प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
आयक्यूएसी विभागाने शिक्षकांसाठी तयार केलेल्या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन कुलगुरू डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना डॉ. डी. डी. पवार यांनी पुढील नॅकसाठी आवश्यक असलेल्या बाबींची सविस्तर मांडणी करतांना शिक्षकांकडून आवश्यक त्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. डॉ. बी. सुरेंद्रकुमार रेड्डी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून शेवटी उपस्थितांचे आभार मानले. प्र कुलगुरू डॉ जे एम बिसेन, अधिष्ठाता डॉ अजय टेंगसे, डॉ एल एम वाघमारे यांची या वेळी उपस्थिती होती.