पुणे/विश्रांतवाडी – विमाननगर येथील फोर पॉइंट पंचतारांकित हॉटेलमधील कामावरून काढून टाकलेल्या 40 मराठी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचा विचार पाच दिवसात करण्यात आला नाही तर मनसे स्टाइलने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस व जनाधिकार सेनेचे पुणे शहराध्यक्ष विशाल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकारी तसेच त्या अन्यायग्रस्त कामगारांसह हॉटेल व्यवस्थापनाची बैठक झाली. फोर पॉइंट हॉटेलमधील व्यवस्थापनाने एक महिन्यापूर्वी कामगारांना कामावरून तडकाफडकी कमी करीत त्यांच्याऐवजी परप्रांतीय कामगारांना रुजू करण्यात येणार असल्याची तक्रार मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे आली होती.
याची दखल घेत मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस व जनाधिकार सेनेचे पुणे शहराध्यक्ष विशाल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर उपाध्यक्ष अरुण येवले, प्रभागाध्यक्ष अच्युतराव मोळावडे, गणेश पाटील, दशरथ चव्हाण, गणेश भोपळे, रियाज शेख, संदीप सिध्दुल, अजय बुलबुले, श्रीराम पाटील, सुरज केदारी, कैलास गव्हाणे हे थेट हॉटेलमध्ये गेले. यावर हॉटेल व्यवस्थापनाने देखील सर्वांशी शांततेत सविस्तर चर्चा केली. तसेच दिल्लीतील वरिष्ठांशी बोलणी करून लवकरात लवकर तोडगा काढू, असे आश्वासन दिल्याचे जनाधिकार सेनेचे उपाध्यक्ष अरुण येवले यांनी सांगितले.