मराठी पाऊल पडते पुढे ! शेतकऱ्याच्या मुलीची आसाम रायफलमध्ये निवड

गांजे गावच्या शिल्पा पांडुरंग चिकणेची आसाम रायफलमध्ये निवड

सातारा  -जावळी तालुक्‍यातील दुर्गम भागातील गांजे गावच्या कन्येची भारतीय सैन्य दलाच्या आसाम रायफलमध्ये निवड झाली आहे. शिल्पा पांडुरंग चिकणे असे या युवतीचे नाव आहे. विशेष म्हणजे शिल्पा ही सैन्य दलात भरती होणारी तालुक्‍यातील पहिली युवती आहे. शिल्पाच्या या यशामुळे तालुक्‍याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मेढ्याच्या दक्षिण बाजुला दुर्गम भागात वसलेल्या गांजे येथील पांडुरंग चिकणे व पार्वती चिकणे या शेतकरी दांपत्याला एकूण सहा मुली.

त्यापैकीच एक म्हणजे शिल्पा. सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे ध्येय बाळगून शिल्पा त्यादृष्टीने कठोर परिश्रम घेत होती. बारावीचे शिक्षण झाल्यानंतर तिने खडतर परिश्रमाला सुरुवात केली. जावळी करिअर ऍकॅडमीमध्ये संतोष कदम यांचे तिला सैन्यभरतीसाठी मार्गदर्शन लाभले. संतोष कदम यांनीही शिल्पाच्या घरची परिस्थिती लक्षात घेऊन तिच्याकडून एक रुपयाही फी न घेता तिला दत्तक घेतले. घरच्या हलाखीच्या परिस्थितीचा बाऊ न करता तिने परिस्थितीशी लढत मेहनत घेतली. त्याचबरोबर तिने शिक्षण सुरू ठेवले.

सध्या ती बीकॉमच्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. भारतीय सैन्य दलात जागा निघाल्यानंतर तिने फॉर्म भरला होता. कोल्हापूरला शारीरिक फिटनेस परीक्षेत ती यशस्वी ठरली. उरण येथे लेखी परीक्षा, तर पुण्यात मेडिकल झाले. या तीनही ठिकाणी चांगल्या पद्धतीने यश मिळाल्यावर तिला “आसाम रायफल’मध्ये निवड झाल्याचे समजल्यानंतर चिकणे कुटुंबीय आनंदून गेले. ही बातमी गावात व परिसरात समजल्यानंतर लोकांनी धाव घेऊन तिच्या परिश्रमाचे कौतुक करत अभिनंदन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.