विविधा : राम शेवाळकर

-माधव विद्वांस

मराठी साहित्यिक, प्रभावी वक्‍ते राम शेवाळकर यांचा आज जन्मदिन. उत्तम कीर्तनकार म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्यांचे मूळ गाव परभणी जिल्ह्यातील शेवाळे असल्यामुळे त्यांचे आडनाव शेवाळकर झाले. त्यांचे मूळ आडनाव धर्माधिकारी होते. त्यांचा जन्म 2 मार्च, 1931 रोजी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे झाला. त्यांचे वडील “कीर्तनकेसरी’ म्हणून विदर्भात प्रसिद्ध होते. त्यांच्या घराण्यात वेदशास्त्रसंपन्नतेचा वारसा होता. वडिलांचा वक्‍तृत्वाचा वारसा त्यांच्याकडे आला होता. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यात सभाधीटपणा आणि अमोघ वाणी आली व वक्‍ता दशसहस्त्रेषु ही उपाधी त्यांना मिळाली.

त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अचलपूर येथे झाले. वर्ष 1952 मध्ये अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून ते बीए आणि वर्ष 1954 नागपूर विद्यापीठातून एमए (संस्कृत) तर वर्ष 1956 मध्ये एमए (मराठी) झाले. सुरुवातीस वाशीम येथील शासकीय प्रशालेत त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर निरनिराळ्या महाविद्यालयांतून प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केले.

लहानपणापासूनच त्यांना कविता करण्याचा छंद होता. “असोशी’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर रेघा (1967) आणि अंगारा (1989) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कवितेवर निसर्गाचा प्रभाव दिसून येतो. कवितेबरोबर त्यांनी अनेक निबंधही लिहिले. अग्निमित्र (1976), अमृतझरा (1976), देवाचे दिवे (1989), रूचिभेद (1989) आणि सारस्वताचे झाड (1989), तारकांचे गाणे (1994) हे त्यांचे काही ललित निबंधसंग्रह होत. लोकनायक बापूजी अणे ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकनायकांचे वाङ्‌मय प्रकाशित केले. शेवाळकरांनी तब्बल 48 पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत.

शेवाळकरांनी साहित्यिक क्षेत्रात तसेच सांस्कृतिक-शैक्षणिक संस्थांतून विविध पदांवर कार्य केले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद नऊ वर्षे भूषविले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा (उपाध्यक्ष), महाराष्ट्र साहित्य परिषद (उपाध्यक्ष) ह्या संस्थांचे ते पदाधिकारी होते. साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळ अशा शासकीय मंडळांवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. वर्ष 1994 मध्ये पणजी (गोवा) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. सेन्सॉर बोर्डाचेही ते 11 वर्षे सदस्य होते. अत्यंत ओघवती भाषा अभ्यासपूर्ण सुंदर विवेचन यामुळे त्यांच्या ध्वनिफिती दर्दी रसिकांनी अक्षरशः डोक्‍यावर घेतल्या.

त्यांनी अनेक होतकरू मराठी तरुणांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन व मदत केली. आपल्या शिक्षण संस्था अडचणीत असताना पत्नीचे दागिने गहाण ठेवून संस्थेचा गाडा त्यांनी चालू ठेवला होता. त्यांच्या एका मरणासन्न मित्राला अखेरच्या काळात समाधान लाभावे एवढ्याच एका हेतूने त्याचे अप्रकाशित लिखाण, त्याला कळूही न देता पुस्तकरूपाने त्यांनी छापले आणि मित्राला भेट दिले. 3 मे, 2009 त्यांचे नागपूर येथे निधन झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.