शिक्षण विभागाचा निर्णय : …तरच व्यवसाय विषय निवडता येईल
पुणे – राज्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या व्यवसाय शिक्षण योजनेत काही माध्यमांच्या शाळांनी मराठी विषय वगळून व्यवसाय शिक्षण विषय निवडले आहेत. त्यामुळे शासनाच्या मराठी विषय अनिवार्य असल्याच्या मूळ धोरणाला बाधा येत आहे. त्या पार्श्वभूूमीवर इंग्रजी व अन्य माध्यमांच्या शाळांना मराठी विषय अनिवार्य राहील. मात्र, सामाजिक शास्त्र किंवा अन्य भाषा या विषयांऐवजी व्यवसाय विषय निवडता येतील, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण योजना गेल्या पाच वर्षांपूर्वी सुरू केली होती. त्यानुसार काही शाळांनी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम सुरू केला. त्यात विद्यार्थ्यांना विषय निवडीचे विकल्पही देण्यात आले होते. त्यानंतर राज्य शासनाने इंग्रजी व्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या विद्यार्थ्यांना द्वितीय भाषेएवेजी व्यवसाय शिक्षण निवडण्याचे व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना भाषा – 2 व भाषा – 3 ऐवजी व्यवसाय विषय निवडण्याची मुभा देण्यात आली होती.
नव्याने शुद्धिपत्रक प्रसिद्ध
दहावी परीक्षेत हिंदी, उर्दू, गुजराती इत्यादी माध्यमांच्या काही शाळांनी मराठी विषय वगळून व्यवसाय शिक्षण निवडल्याची बाब समोर आली. त्यामुळे शासनाच्या मराठी भाषा अनिवार्य असल्याच्या मूळ धोरणाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून आले. या घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये म्हणून राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने आज नव्याने शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले. त्यात मराठी विषय अनिवार्य असून त्याऐवजी व्यवसाय शिक्षण निवडता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
विद्यार्थी संख्या निश्चित
मराठी माध्यमांच्या शाळांना द्वितीय भाषा किंवा सामाजिक शास्त्रे या विषयांऐवजी व्यवसाय शिक्षण निवडता येतील. तसेच या योजनेंतर्गत व्यवसाय शिक्षण ज्या शाळांमध्ये सुरू आहे. त्यांना दोन व्यवसाय विषयाचे ट्रेड व विद्यार्थी संख्या असे निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनातर्फे ज्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण सुरू करण्यास परवानगी मिळालेली आहे. त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण घेण्यास मुभा देण्यात येत असल्याचे राज्य शासनाकडून आज स्पष्ट करण्यात आले.