नगर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यसंमेलनास यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. सांगलीसह राज्यातील 13 जिल्ह्यांत नाट्यसंमेलन होणार असून, यात नगरचा समावेश आहे.
नगरमध्ये 27 ते 30 मार्च नाट्यजागर व 1 ते 3 मे दरम्यान नाट्यसंमेलन होणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य दिगंबर प्रभू, अशोक नारकर, सतीश लोटके, नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, शशिकांत नजान, संजय घुगे, श्याम शिंदे, सतीश शिंगटे आदी उपस्थित होते. 27 मार्च ते 14 जून या कालावधीत 13 जिल्ह्यात नाट्यसंमेलन होणार आहे. जागतिक रंगभूमी दिनी (दि.27 मार्च ) सांगली येथे नाट्य संमेलनास सुरूवात होणार आहे.
या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे असून दिग्दर्शिका सई परांजपे उद्घाटक आहेत. जब्बार पटेल हे संमेलनाध्यक्ष आहेत. व्यंकोजी राजे यांचे सुपुत्र दुसरे शहाजी राजे यांनी तंजावर (तमिळनाडू) येथे मोठी नाट्यसंपदा रचली आहे. त्यामुळे तंजावर येथून ज्योत आणून सांगलीत नाट्यसंमेलनाचा प्रारंभ, तर मुंबईत समारोप होणार असल्याचे कांबळी व पोंक्षे यांनी सांगितले.
नगरमध्य 27 ते 30 मार्च या कालावधीत नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नाट्यजागर होणार आहे. यात गाजलेली नाटके सादर होणार आहेत. 1 ते 3 मे या कालावधीत नाट्यसंमेलन होणार आहे. नगरमध्ये हे तिसरे नाट्यसंमेलन असल्याचे सतीश लोटके यांनी सांगितले नाट्यसंमेलनासाठी शासनाने दिलेले 10 कोटींचे अनुदान जास्त असल्याची चर्चा होत आहे. मात्र, हे अनुदान कमी आहे, असे शरद पोंक्षे यांनी सांगितले. 2006 साली नांदेडला नाट्य संमेलन झाले होते. त्यावेळी शासनाकडून 5 लाख अनुदान देण्यात आले होते तर खर्च 40 लाख झाला होता. त्याचा विचार करता आताचे 10 कोटीचे अनुदान कमी असल्याचे ते म्हणाले.