नवी दिल्ली – जामिया विद्यापीठाच्या आवारातील गोळीबाराच्या घटनेचा देशभरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर काल एका माथेफिरूने विद्यापीठाच्या आवारामध्ये घुसून गोळीबार केला होता. यावेळी गोळीबार करणाऱ्या या तरुणाने, ‘हे घ्या स्वातंत्र्य’ अशा घोषणा देखील दिल्या होत्या.
याच पार्श्वभूमीवर आता जामिया विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेने विद्यापीठातील गोळीबारास भाजपचे खासदार अनुराग ठाकूर हेच जबाबदार असल्याचा थेट आरोप लगावला आहे. आपल्या आरोपाचे समर्थन करताना शिक्षक संघटनेने, ‘काही दिवसांपूर्वी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी दिल्ली येथील एका प्रचार सभेमध्ये बोलताना उपस्थितांना देशाच्या गद्दारांना गोळ्या घाला अशी प्रक्षोभक घोषणा देण्यास प्रवृत्त केलं होतं. जर जनतेतून निवडून गेलेला खासदारचं अशा प्रक्षोभक घोषणा देण्यास भाग पाडत असेल तर जामियामध्ये घडलेली घटना काही नवल नाही.’ असा दावा केला आहे.
“जनतेतून निवडून गेलेला खासदार व विद्यमान केंद्रीय मंत्री जर सार्वजनिक व्यासपीठावरून आशा प्रकारच्या प्रक्षोभक घोषणा देण्यास प्रवृत्त करत असेल तर त्यापेक्षा मोठा राष्ट्रद्रोह काय? आम्ही ठाकूर यांच्या वक्तव्याचा व काल घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो.” अशी भूमिका देखील शिक्षक संघटनेकडून मांडण्यात आली आहे.