मुंबई – 2019 विधासभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, संपूर्ण महाराष्ट्राला राजकीय रंग चढला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांनी सुद्धा राज्यातील विविध मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यंदा राज्यातील विधानसभा निवडणुकीत तीन कलाकार आपले नशीब आजमावणार आहेत. दीपाली सय्यद, अभिजीत बिचुकले आणि गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून गायक आनंद शिंदे यांना मात्र उमदेवारी मिळालेली नाही.
‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेले अभिजीत बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात बिचुकले निवडणूक लढणार आहेत.
तर, दुसरीकडे मराठी चित्रपटसृष्टीतील सिनेतारका अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी शिवसेनेकडून कळवा-मुंब्रा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यंदा कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड विरुद्ध शिवसेनेच्या दीपाली सय्यद असा सामना रंगणार आहे.
भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी देखील बारामती मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात पडळकर यांचा सामना असणार आहे.