मुंबई – बॉलीवूू़ड आणि हॉलीवूडमध्ये ॲक्शन सिन्स आणि स्टंट्स अगदी सर्रासपणे आपल्याला पहायला मिळतात. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आतापर्यंत ॲक्शन स्टंट असलेला चित्रपट आलेला नाही. आता मराठी रसिक प्रेक्षकांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. समीर मुकुंद आठल्ये दिग्दर्शित आणि राजकुमार मेन्डा निर्मित ‘बकाल’ हा पहिला मराठी भव्य ॲक्शनपट येत्या ८ नोव्हेबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील मुख्य नायिका जुई बेंडखळे हिने चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ऐंशी-नव्वदच्या दशकात विदर्भातील तरुणांना गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या विळख्यात जखडून ठेवणाऱ्या ‘बकाल’ नावाच्या एका विखारी, अदृश्य यंत्रणेने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या यंत्रणेचा म्होरक्या ना कधी जगासमोर आला ना सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागला. अशा ‘बकाल’ नावाच्या घातक शक्तीला एका समांतर सुरक्षा संघटनेच्या तरूणांनी मोठ्या शिताफीने आश्चर्यकारकरित्या उध्वस्त केले. या सत्यघटनेच्या आणि विदर्भाचे सांस्कृतिक वैभव असलेल्या ‘मारबत’ परंपरेच्या मूळ उद्देशाच्या बकालची कथा बेतली आहे.
या चित्रपटात मुंबईचा चैतन्य मेस्त्री हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. बकालमधील जवळपास सर्व स्टंट्स आणि ॲक्शन सीन्स त्याने स्वत: केले आहेत. त्याच बरोबर जुई बेंडखळे या नवोदित अभिनेत्रीने मुख्य नायिका साकारली आहे. अशोक समर्थ, अलका कुबल, गणेश यादव, यतीन कारेकर, मिलिंद गवळी, असीत रेडीज, जयंत सावरकर, पुजा नायक आदी कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.