मराठ्यांना कळलं पाहिजे तलवारी कधी काढायच्या आणि तह कधी करायचा- राणे

मराठा समाजाच्या प्रतिनिधींचं ऐकायचं नव्हतं तर मीटिंग का बोलावली

मुंबई: आज सारथी संस्थे संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विनंतीनुसार पार पडली. या बैठकीला खा. छत्रपती संभाजी राजे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक उपस्थित होते.

दरम्यान, या बैठकीत छत्रपती संभाजी राजे यांना तिसऱ्या रांगेत बसवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसेच विरोधकांनी देखील सत्ताधारी पक्षांवर टीका केली. भाजप नेते  निलेश राणे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

सारथी संस्थेला भरीव आर्थिक निधीची मागणी मराठा समाज सातत्याने करतोय. या बैठकीला संभाजीराजेना तिसऱ्या रांगेत बसण्याचं कारण काय? या सरकारला इतरांची किंम्मत कळत नाही. निषेध करतोच पण मराठ्यांना पण कळलं पाहिजे तलवारी कधी काढायच्या आणि तह कधी करायचा, असे निलेश राणे म्हणाले.

राणे म्हणाले, सारथीच्या बैठकीमध्ये झालेला गोंधळ हा राज्य सरकारला जाणून-बुजून घालायचा होता असं दिसतं. महाराष्ट्रातून आलेले मराठा समाजाचे प्रतिनिधी बाहेर ठेवून त्यांना बोलायला न देता फक्त संभाजीराजेंना एका चेंबरमध्ये बसून मीटिंग करण्यात आली, सारवासारव पत्रकार परिषद झाली आणि सरकारने पळवाट काढली.

जर मराठा समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींचं ऐकायचं नव्हतं तर मीटिंग का बोलावली. उपमुख्यमंत्री अजित पवारांना जेव्हा प्रतिनिधींनी विचारलं संभाजीराजेंना मागे का बसवता तर ते म्हणाले राज्यसभेत पण राजे मागेच बसतात. अपमान करण्यासाठी सारथीची बैठक लावली होती का?, असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.