मराठा समाज झुकणार नाही – चंद्रकांत पाटील

मुंबई – सोलापूरच्या मोर्च्यात आघाडी सरकारने प्रचंड पोलीस बळ वापरून दडपशाही केली, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. अशा प्रकारे आक्रोश दाबण्याचा सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही आणि मराठा समाज कधी झुकणार नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निषेध नोंदवला.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी एका पत्रकाद्वारे निषेध व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण न्यायालयाकडून रद्द झाले. त्याबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने आजच्या सोलापूरमधील मोर्चासाठी जय्यत तयारी केली होती.

त्यासाठी जिल्ह्यातील गावोगावातून हजारो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मराठा स्त्री-पुरुष सोलापूरकडे रवाना झाले होते. पण सरकारने पोलिसी बळाचा वापर करून ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांना अडवले आणि सोलापूरमधील मोर्चा होऊ नये यासाठी दडपशाही केली.

मराठा समाजातील समन्वयकांना पोलिसांनी कालपासूनच नोटिसा बजावल्या होत्या. पण अशी दडपशाही करून सरकार मराठा समाजाचा आक्रोश दाबू पाहत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. दबाव आणला तर मराठा समाज सरकारविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.