सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण टिकणार – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – मराठा आरक्षण कायद्याच्या सर्व कसोटीवर खरे उतरेल. यासाठी सर्वोच्च न्यायालयात निष्णांत कायदे तज्ज्ञांचे सहकार्य घेऊन राज्य शासनाने आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना सुरु केल्या आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या निर्णय प्रक्रियेत सक्रीय योगदान दिलेल्या मान्यवरांचा सकल मराठा समाज कोल्हापूरच्या वतीने येथील केशवराव भोसले नाट्यगृहात कृतज्ञता सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, महापौर माधवी गवंडी, खासदार धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, माजी खासदार धनंजय महाडीक उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास राहिलेल्या मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरविले आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत दाखल होणाऱ्या याचिकावेळी समाजाला दिलेले आक्षरण कायद्याच्या कसोटीवर खरे ठरण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात कायदे तज्ज्ञांची फौज उभी करेल. सर्वोच्च न्यायालयातही राज्य शासन व सकल मराठा समाजाला टीम वर्क करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

या आरक्षणामुळे मराठा समाजातील मुलांना नोकरी व शिक्षणात याचा लाभ होणार आहे. मात्र केवळ नोकरीसाठी आरक्षण यावर विसंबून न राहता मराठा समाजासाठी असणाऱ्या शासनाच्या सर्व योजना सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी तळागाळात पोहोचविल्या पाहिजेत. शिक्षण, नोकरीनिमित्त शहरात येणाऱ्या मराठा समाजाच्या मुलांची राहण्याची सोय व्हावी यासाठी कोल्हापूर येथे मराठा भवन उभारणीस आवश्‍यक ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा आपण आनंदोत्सव साजरा करत असताना या पुढे समाजहिताची मोठी कामे करावी लागणार याची जबाबदारीही आपण घेतली पाहिजे. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजचे असल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.