मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी राज्याचा दौरा सुरू केला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याला प्रारंभ केला.
यातच आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांनी आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत संभाजीराजे यांनी मोठे विधान केले आहे या भेटीबाबत त्यांनी सांगितले,’गेल्या कित्येक दिवसांपासून मी राज्याचा दौरा करून मराठा समाजाच्या भावना जाणून घेतल्या.’
‘या भावना मी आज शरद पवार यांना सांगितले. मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांना सांगितले. एकूणच या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.’
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काय करता येईल यासाठी सर्वांचे मत घेऊन ( 27 मे) आज ते आपली सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत. त्याबाबत मराठासमाजामध्ये उत्सुकतेची भावना आहे. संभाजी राजे यांच्या या दौऱ्याकडे विविध राजकीय पक्ष लक्ष ठेवून आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन न करण्याचे आवाहन संभाजी राजे यांनी केले होते.