नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे ज्या गोष्टीकडे लागले होते, त्या मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज पूर्ण झाली आहे. आजच्या सुनावणीत घटनापीठाने कोणताही निर्णय दिला नाही. उलट पुढील सुनावणी ही 5 फेब्रुवारीला होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. यावरून आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
पत्रकारांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘हे सरकार प्रत्येक सुनावणीत वेगळी भूमिका मांडत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे यामुळे सरकारच्या या भूमिकांमुळे मराठा आरक्षण अडचणीत आले आहे.
दरम्यान, 25 जानेवारी रोजी होणारी सुनावणी आजच सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे घेण्यात आली. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसेच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे ही सुनावणी पार पडली.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या वतीने वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला. मराठा आरक्षणावरील सुनावणी सोमवार 25 जानेवारीपर्यंत तहकूब करण्याची मागणी केली. त्यानंतर घटनापीठाच्या न्यायमूर्तीने चर्चा करून पुढील सुनावणीही 5 फेब्रुवारीला घेण्यात येईल, असे नमूद केले आहे.
या अगोदर 9 सप्टेंबर 2020 ला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी उमटली होती. मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेत आंदोलने केली होती. 2018 तत्कालीन महाराष्ट्र सरकारने कायदा करून मराठा आरक्षण आणले होते. त्यानुसार शिक्षण संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा