Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी दिल्लीत आंदोलन

नवी दिल्ली – मंगळवारी मराठा महासंघाच्यावतीने राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने आता घटनादुरुस्ती करावी, 50 टक्क्यांच्या वर आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी आंदोलकांच्यावतीने करण्यात आली. महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांच्या नेतृत्वावाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषणही यावेळी करण्यात आले.
या आंदोलनात महिलांची संख्याही लक्षणीय होती. महाराष्ट्रातल्या अनेक खासदारांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. केंद्र सरकारने नचीअप्पन समितीच्या शिफारशी स्वीकारुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे हाच आता पर्याय उरल्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले तरच ते टिकाऊ ठरेल; पण ते देण्यास सरकार असमर्थ असेल तर केंद्र सरकारने 2004 साली तत्कालीन खासदार सुदर्शन नच्चीअप्पन यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या दहा पक्षांच्या 28 खासदारांच्या समितीच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठीच्या शिफारशी स्वीकारून 50 टक्क्यांच्यावर आरक्षणाची मर्यादा वाढवावी किंवा अन्य कोणत्याही मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका अखिल भारतीय मराठा महासंघाने घेतली आहे.
ओबीसी प्रवर्गाला आधीच 27 टक्के आरक्षण असून त्यामध्ये 366 जाती आहेत. त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष त्यात अजून वाढ करून त्यांचा रोष ओढवून घेण्यास तयार नाही. त्या मागणीतून फारसे काही साद्य होईल असेही वाटत नसल्याचे मराठा महासंघाने यावेळी म्हटले. त्यामुळे आरक्षण मर्यादेत 50 टक्क्यांहून अधिक वाढ करण्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागेल.
एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची दखल केंद्र सरकारचे न घेतल्यास या पुढे देशातील अन्य राज्यातील आरक्षणा पासून वंचित सर्व घटकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने केंद्र सरकारला देण्यात आला आहे.





