पुणे – आरक्षणासह मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दि. 14 डिसेंबर रोजी वाहन लॉंग मार्च आयोजित करण्यात आला होता. परंतु, याला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आझाद मैदान येथील आंदोलक मराठा विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील खटला लक्षात घेऊन मराठा क्रांती मोर्चाच्या दि. 10 डिसेंबर रोजीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. दि. 1 व 2 डिसेंबरला राज्यात ठिकठिकाणी उमेदवारांच्या नियुक्तीसाठी महावितरणसमोर आंदोलन केले आहे. करोनामुळे पोलिसांनी वाहन लॉंग मार्चला प्रतिबंध घातला आहे.
त्यामुळे आझाद मैदान येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
या उमेदवारांचा नियुक्तीचा प्रश्न, सारथी संस्था गतिमान करणे, अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डीतील आरोपीचा खटला, मराठा आंदोलनातील तरुणांवरील उर्वरित केसेस मागे घेणे यांसह इतर मागण्या सोडवण्यासाठी आमदारांनी हे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून सोडवावेत, असे आवाहन सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बैठकीत करण्यात आले आहे.