Maratha Cooperative Bank Cosmos Bank Merger | मुंबई येथील मराठा सहकारी बँकेच्या सर्व सात शाखा आजपासून रिझर्व्ह बँकेच्या मंजूरीने कॉसमॉस बँकेच्या शाखा म्हणून ग्राहक सेवेत रूजू झाल्या आहेत. कॉसमॉस बँकेच्या सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा आता या ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी दिली. सीए काळे यांनी या विलीनीकरणाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, रिझव्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार ३५ एआय डी अंतर्गत रिझर्व्ह बँकेचे निर्बंध असलेल्या अनेक बँकांपैकी पहिल्याच बँकेचे हे विलीनीकरण आहे.
सदर विलीनीकरणामुळे ठेवीदारांच्या रू.८४ कोटींच्या ठेवींना संरक्षण मिळाले असून डीआयसीजीसीने पेमेंट केलेल्या रू.५ लाखाखालील ठेवीदाराच्या रू.११२ कोटींची जबाबदारी बँकेने घेतली आहे. निगेटिव्ह नेटवर्थ असूनही ठेवीदारांच्या सर्व ठेवींचे संरक्षण करण्याची जबाबदारी कॉसमॉस बँकेने घेतली आहे. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. कॉसमॉस बँकेने पूर्वाश्रमीच्या मराठा सहकारी बँकेच्या सर्व सेवकांनाही आपल्यात सामावून घेतले आहे. सहकार क्षेत्रात यानिमित्ताने नवीन पायंडा पडला आहे असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
सीए काळे पुढे म्हणाले की, कॉसमॉस बँक व मराठा सहकारी बँकेच्या या ऐच्छिक विलीनीकरणामुळे आमच्या बँकेत आत्तापर्यंत एकूण १७ लहान बँका विलीन झाल्या आहेत. लाखो ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण यामुळे झाले आहे. कॉसमॉस बँकेचा आर्थिक पाया भक्कम असून मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने रु.३०७०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. तसेच रू.१५१ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेचे भाग भांडवल व स्वनिधी रू.२००० कोटींच्यापेक्षा जास्त आहे. तीव्र बँकिंग स्पर्धेमुळे लहान सहकारी बँकांना कामकाज करणे अवघड होऊन बसले आहे. कॉसमॉस बँकेने अशावेळी सहकाराचे तत्व जपत अनेक बँकांना सहकार्य केले आहे.
यामुळे सहकारी बँकांमध्ये ठेवीदार सुरक्षित असल्याची शाश्वती दिली आहे. सदर विलीनीकरणामुळे कॉसमॉस बँकेच्या आता मुंबईमध्ये एकूण ४० शाखा झाल्या आहेत आणि एकूण सात राज्यात १५९ शाखा झाल्या आहेत. पूर्वाश्रमीच्या मराठा सहकारी बँकेच्या खातेदारांनी ठेवीदारांनी आपले बँकिंग व्यवहार पूर्ववत सुरू करावेत असेही आवाहन सीए काळे यांनी सर्व खातेदारांना केले आहे. पूर्वाश्रमीच्या मराठा सहकारी बँकच्या अंधेरी पूर्व येथील मुख्य कार्यालयात एका छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने मराठा सहकारी बँकेचे संचालक तसेच कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष श्री. प्रवीणकुमार गांधी, सर्व संचालक आणि व्यवस्थापकीय संचालिका सौ. अपेक्षिता ठिपसे उपस्थित होते.