पुण्यात भाजपाविरोधात मराठा कार्ड चालणार ?

पुणे – अन्य कोणत्याही जागांसाठी एवढी चर्चा झाली नसेल, एवढी चर्चा आणि विचारमंथन कॉंग्रेस, राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेसाठी चालवले आहे. राहूल गांधी यांनी पक्षाची सुत्रे हातात घेतल्यापासून पक्षात युवा वर्ग आणि नवीन चेहऱ्यांवर त्यांनी जास्त भर दिला आहे. उत्तरेत त्यांनी नवीन पिढीला जवळ केले. नव्हे तीन राज्यांच्या झालेल्या निवडणुकीतही त्यांनी अनपेक्षीतपणे नवीन चेहऱ्यांना संधी दिली. बदल्यात त्याचे परिणाम चांगले झाले. पुण्यातही ते या वेळी असा प्रयोग करून पाहतील, असे चित्र दिसत आहे.

पुण्यासारख्या भागामध्ये कॉंग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. मात्र केवळ मतदारवर्ग मोठा असला तरीही त्या ताकदीचा उमेदवार किंवा इलेक्‍टोरल मेरीट असलेल्या नेत्याची उणीव माजी खासदार कलमाडी यांच्यानंतर कॉंग्रेसला प्रकर्षाने जाणवत आहे. वास्तविक पाहता पुढे जाणाऱ्याने दूसरी फळी निर्माण करणे आवश्‍यक होते. पण तसे न झाल्याने कलमाडी यांच्या नंतर पुण्यातली कॉंग्रेस अनाथ झाल्यासारखी झाली.

मोहन जोशी, अभय छाजेड, अनंत गाडगीळ अशी काही नावे चर्चेत राहिली. त्यानंतर संजय काकडे यांनी पण व्हाया अजित पवार जात कॉंग्रेसच्या जागेसाठी प्रयत्न करून पाहिला. आणि आता मराठा क्रांती मोर्चाचे नेते प्रवीण गायकवाड यांचे नाव चर्चेत आहे. प्रवीण गायकवाड यांचे नाव राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीला सुचवल्याचे वृत्त आहे. पुण्यात कॉंग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणात असला तरी, निर्नायकी अवस्थेमध्ये पुण्यात राष्ट्रवादीचे सहकार्य त्यांना लागणारच आहे. अशा परिस्थितीत भाजपाच्या ब्राम्हण कार्डाविरोधात पवारांनी मराठा कार्डाला पाठबळ दिले तर आश्‍चर्य वाटायला नको. सध्या मराठा आरक्षणाविषयी वातावरण तसेही तापलेले आहेच. दहा टक्के आरक्षण देउनही अजून तो कायद्याच्या कसोटीवर तपासला गेलेला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचे भवितव्य अंधारातच आहे, असे म्हणावे लागेल.

प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे कट्टर कार्यकर्ते, त्यानंतर त्यांनीे शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठीही काम केले. मराठा क्रांती मोर्चाची तोफ म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले गेले. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या नावाची शिफारस कॉंग्रेस हायकमांडला गेली. प्रवीण गायकवाड यांच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी आहे, जी त्यांनी मराठा मोर्चाच्या माध्यमातून उभी केली आहे. एक मराठा लाख मराठा अशा लढवैय्या वृत्तीचे कार्यकर्ते ही त्यांची मोठी जमेची बाजू म्हणता येईल. अन्य इच्छुकांशी तुलना केली तर अशा प्रकारचे काम आणि असे नेतृत्व कोणालाही सिद्ध करता आलेले नाही. संजय काकडे हे मागच्या दाराने झालेले खासदार आहेत, असे म्हटले जाते. अन्य इतर इच्छुकांचा देखील फारसा प्रभाव पडलेला दिसून आलेला नाही.

बाहेरचा उमेदवार नको, असे म्हणणे सोपे आहे, पण बाहेरचा का नको, याचे उत्तर हे नेते देउ शकणार नाहीत, हे निश्‍चित. प्रवीण गायकवाड यांची निवड झाली तर म्हणूनच आश्‍चर्य वाटायला नको. केवळ कॉंग्रेसशी निष्ठावान राहणे, एवढेच उमेदवारी मिळण्याचे परिमाण असू शकत नाही, हे आता सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. ती वेळ कॉंग्रेससाठी आली आहे.

मराठा आरक्षणावेळी काढलेल्या मोर्चामध्ये आपण कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही, किंवा कोणत्याही मोठ्या पक्षामध्ये सामील होउन त्यांच्या तिकीटावर निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा त्या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे संजीव भोर पाटील यांनी केली होती. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. रडत खडत का होईना, पण मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाची घोषणाही झाली आहे. त्यामुळे मराठा क्रांतीची ज्योत आता तशी मंदावली आहे. मराठा आरक्षण प्रत्यक्षात अवतरले असले, तरी त्याला अजून कायद्याच्या भट्टीतून तावून सुलाखून निघावे लागणार आहे. त्यासाठी हातात सत्ता असेल, तर हे काम सुरळीतपणे करता येउ शकते, असाही एक सुज्ञ विचार त्यामागे असावा.

त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आता उघडपणे तयारी सुरू केली आहे. त्यांच्या नावाची चर्चा होत असल्यामुळे कॉंग्रेस निष्ठावंतांच्या गोटात छुपी अस्वस्थता पसरली आहे. कॉंग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार आदी सर्वांनीच आयात उमेदवाराला विरोध दर्शवला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात येउन सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला होता.

त्याचा परिणाम काय झाला आहे, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. अनंत गाडगीळ यांच्या लागलेल्या मोठमोठ्या फलकांनी गाडगीळ यांचा मनसुबा मात्र उघड केला असला तरीही शेवटी दिल्लीचे हायकमांडच अंतीम निर्णय घेणार आहे, आणि कॉंग्रेसच्या पक्ष शिस्तीनुसार अन्य सर्व शिलेदार आपल्या तलवारी पुन्हा पाच वर्षांसाठी म्यान करतील, असे आतातरी चित्र दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.