चाकण भडकले

मराठा आंदोलनाला हिंसक वळण : बसेससह खासगी गाड्यांची तोडफोड, जाळपोळ

पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा; कलम 144 (जमावबंदी) लागू

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चाकण परिसरात तणावपूर्ण शांतता : 25 वाहने भस्मसात केवळ सांगाडे शिल्लक; 100 ते 150 गाड्या फोडल्या

चाकण – गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेले मराठा मोर्चा आंदोलन आता हाताबाहेर गेले आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण खेड तालुक्‍यातील चाकण परिसरात आंदोलकांनी जबरदस्त तोडफोड केली. तब्बल 100 ते 150 गाड्या आंदोलकांनी फोडल्या आहे. तर 25 पेक्षा अधिक गाड्या जाळण्यात आल्या असून त्यांचे केवळ सांगाडेच शिल्लक राहिले आहे. तर आंदोलकांनी चाकण पोलीस चौकीवर दगडफेक करीत पोलिसांची वाहने पेटवून दिली. बसस्थानकातील बसेस पेटविल्याने आंदोलन चांगलेच हिंसक झाल्याने आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला तरीही आंदोलक शांत न झाल्याने अखेर पोलिसांनी जमावबंदीचे कलम 144 लागू केली. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत चाकण परिसरात तणावपूर्ण शांतता होती.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी खेड तालुका बंदची हाक दिली होती. त्याप्रमाणे चाकण येथे शांततेच आंदोलन सुरू झाले होते मात्र, अचनाक तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली आहे. काही बसेस तर जळून खाक झाल्या आहेत. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केले. दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आंदोलकांनी आंदोलन चिघळवले असल्याचे म्हटंले जात आहे.

समाजकंटकांचा पूर्वनियोजित कट?
चाकण मधील आंदोलना दरम्यान मराठा समाजाने मोर्चा काढला होता. त्यावेळी संतप्त झालेला मोर्चा माणिक चौकाकडे गेला असाता त्यावेळी मोर्चामध्ये असलेले अनोळखी चेहरे पाहून स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत संतप्त मोर्चेकरांना पिटाळून लावले. एकंदरीत आंदोलकांमध्ये 15 ते 25 या वयोगटातील कार्यकर्त्यांची संख्या अधिक होती. अनेक आंदोलकांच्या हातात लोखंडी रॉड, काठ्या, दगड आदी हत्यार होती. त्यामुळे चाकण परिसरातील शांततेत सुरू असलेले आंदोलन हिंसक करण्याचा समाजकंटकांचा पूर्व नियोजित कट होता का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

राजगुरूनगरात पोलिसांवर दगडफेक

राजगुरुनगर शहरात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेक सुरू होताच पोलिसांनी अश्रू धुराचे नळकांडे फोडल्याने संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करीत पोलिसांना मारण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करीत जमावाने एका खासगी बसला आग लावली. या आंदोनात जवळपास 40 पेक्षा अधिक खासगी वाहनांच्या काचा फोडल्या.

दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात येवून दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्याना पोलीस रोखू शकणार नसल्याने नांगरे-पाटील यांनी थेट जमावासमोर जावून “मी सुद्धा मराठा आहे, तुमच्या मागण्यांशी सहमत आहे. तुमच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवल्या जातील. आरक्षण आणि इतर मागण्यांवर तोडगा निघण्याचे काम अंतिम टप्यात आहे. हातातोंडाशी आलेला घास अशा पद्धतीने वायाला घालवू नका’ असे आवाहन त्यांनी केल्यावर जमाव शांततेत मागे गेला. तर जिल्ह्यात 135 कलम लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)