सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सोलापूर – मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीनंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून रविवारी संचारबंदीचा आदेश झुगारून सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

सोलापूर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही संयोजक मोर्चा काढण्यावर ठाम राहिल्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

सोलापूर आणि जिल्हाभरातून हजारो मराठा आंदोलक सोलापुरात येणार असल्याने मोर्चाला नेमके कसे रोखायचा, असा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी शहर आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. तसेच सोलापूर शहराकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलीस बंदोबस्त लावल्याने आंदोलकांना सोलापूर शहरात येता आले नाही.

तसे भाजप आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींना ग्रामीण भागातच पोलिसांनी अडविले.त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा होता.

मात्र आमदारांना अडविल्याचे समजताच माजी आमदार नरेंद्र पाटील संतापले आणि जोपर्यंत आमदार सोलापूर शहरात येत नाहीत तोपर्यंत मोर्चा जागेवरून निघणार नाही, असा आक्रमक पवित्र घेतला. त्यामुळे तणावाची परिस्थिती ओळखत पोलिसांनी आमदारांना सोलापुरात येण्यास परवानगी दिली.

यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकातून सकाळी 11 वाजता निघणारा मोर्चा दुपारी दीड वाजता निघाला. या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, “एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

हा मोर्चा संपल्यानंतर संयोजक, माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, महापौर श्रीकांचना यन्नम, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, धैर्यशील मोहिते-पाटील, श्रीकांत देशमुख, शिवानंद पाटील, किरण पवार, राम जाधव आदींनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे प्रमुख आठ मागण्यांचे निवेदन सोपवले.

या मोर्चावेळी दोन्ही बाजूला 110 पोलीस अधिकारी, 1200 पोलीस अंमलदार, 500 होमगार्ड जवान तसेच एसआरपीच्या तीन तुकड्या यासह शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

अधिवेशनावर धडक मारणार
मराठा आक्रोश मोर्चाला सरकारने परवानगी नाकारून मराठा समाजाचा अपमान केला आहे. ब्रिटिशांप्रमाणेच महाविकासह आघाडी सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही तो प्रयत्न हाणून पाडण्यात यशस्वी झाल्याचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकार ब्रिटिशांपेक्षासुद्धा वाईट वागणूक मराठा समाजाला देत आहे. आमचे आंदोलन संपलेले नसून आता मराठा आक्रोश मोर्चा अधिवेशनावर धडकणार असल्याचा इशारासुद्धा त्यांनी दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.