सातारा – अंदमान बेटे समूह किंवा दक्षिण भारतातील अण्णामलाईच्या जंगलक्षेत्रात आढळणारं एक मनोहारी पांढऱ्या कागदासारखे पंख असलेलं “मॅप बटरफ्लाय’ सातारा शहराजवळ आढळून आलं असून त्याच्या कागदासारख्या पांढऱ्या पंखांवर नकाशातील रेषांप्रमाणे अनेक रेषा आढळून येत असल्याने, ते अधिकच खुलून दिसते. कुरणेश्वर वन संवर्धन समितीचे सदस्य सागर कुलकर्णी यांना हे फुलपाखरु नुकतंच यवतेश्वरच्या घाटांत आढळून आलं होतं. त्याचे छायाचित्र त्यांनी सोशल मिडीयामध्ये पोस्ट केल्यानंतर हे फुलपाखरु पाहण्याची अनेकांना ओअढ लागली आहे.
सागर कुलकर्णी हे स्वत: निसर्गप्रेमी असून ते सातारा परिसरातील फुलपाखरे या विषयावर पुस्तक लिहीत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या भागांत निसर्गभ्रमण करत असताना त्यांना अचानकपणे दक्षिण भारतातील या फुलपाखराने दर्शन दिले. सायरेटीस थायोडामो असे या फुलपाखराचे जीवशास्त्रीय नाव असून, हे फूल सह्याद्री पर्वतरांगेत सहसा आढळत नाही. बहुधा स्थलांतर अथवा स्थानभ्रष्ट होत ते यवतेश्वरच्या डोंगरात आले असण्याची शक्यता असून, याविषयी अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे सागर कुलकर्णी यांना वाटते.