इयत्ता आठवीत असतानां केले होते पहिले ‘आंदोलन’
मुंबई: आमदार बच्चू कडू यांनी आज राज्य-मंत्रिपदाची शपथ घेतली. बच्चू कडू यांची राजकारणात दबंग आमदार म्हणून ओळख आहे. इयत्ता आठव्या वर्गात शिकत असतानां बच्चू कडू यांनी गावातील तमाशा बंदी करिता आंदोलन केले होते. त्यानंतर 1994 मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता आंदोलन केले. तसेच कापूस व वीज प्रश्नाकरिता डेरा आंदोलन, आदिवासींच्या जमिनीकरिता अर्धदफन आंदोलन असे अनके वेगळे आंदोलन त्यांनी केले.
बच्चू कडू यांनी स्वतःच्या लग्नाच्या खर्चातून बचत करून 250 अपंगांना लग्न समारंभात 3 चाकी सायकली व कृत्रिम अवयवांचे वाटप केले. विद्यार्थ्यासाठी पुस्तकपेढी योजना तयार केली. तसेच पुर्णा उत्सवांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, विदर्भस्तरीय कुस्ती व कब्बड्डी स्पर्धांचे आयोजन केले. त्याबरोबर आरोग्य क्षेत्रात देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. 1500 हृदय रुग्णांना दत्तक घेऊन उपचार व शस्त्रक्रिया, 200 ब्रेन ट्युमरच्या रुग्णांवर मुंबई येथे सर्वतोपरी उपचार, 100 कर्करोग रुग्णांना वैद्यकीय सहाय्य व सर्वतोपरी मदत, 2000 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 1000 रक्तदान शिबीरांचे आयोजन करून 15000 बाटल्या रक्त के. ई. एम. रुग्णालय, मुंबई, जनरल हॉस्पिटल, अमरावती व मेडिकल कॉलेज, नागपूर येथील रक्तपेढ्यांना पुरवठा केला.
आमदार कडू यांनी स्वत: 70 वेळा रक्तदान केले. अपंगाना सायकलीचे वाटप केले. 1989-92 भारतीय विद्यार्थी सेनेचे ते प्रमुख होते. उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल 2013-14 चा सह्याद्री वाहिनीचा “आर्य चाणक्य” पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त आहे. एम. आय. टी. चा “उत्कृष्ट लोकप्रतिनिधी” पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2011-12 चा “रक्त मित्र” पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.
कडू यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगर परिषदेमध्ये 96 सदस्य निवडून आणण्यात यश मिळवले आहे. 1993-98 सदस्य, ग्रामपंचायत. 1997-2002 सदस्य व 1997-98 सभापती, पंचायत समिती, चांदूर बाजार. 1997-98 सदस्य, जिल्हा परिषद अमरावती. 2004-2009, 2009-2014, सदस्य, महाराष्ट्र विधानसभा. सदस्य, विधिमंडळ पंचायत राज समिती, ग्रंथालय समिती. 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा. ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली.
- नाव: श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
- जन्म: 5 जुलै, 1970
- जन्म ठिकाण : बेलोरा, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती.
- शिक्षण: बी.कॉम.
- व्यवसाय : शेती
- पक्ष: अपक्ष
- मतदारसंघ : 42 -अचलपूर, जिल्हा अमरावती