राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोधकांना टोला
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारादरम्यान प्रत्येक पक्षाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यावेळी शरद पवारांवरदेखील आरोप करण्यात आले होते. त्याच आरोपांचा उल्लेख करत शरद पवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी, अनेकांना वाटत होते, मी निवृत्त होईल पण मी निवृत्त झालो नाही, असा टोला पवार यांनी विरोधकांना लगावला आहे.
बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शन कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. बारामतीतील माळेगाव येथे ‘कृषी प्रदर्शन 2020’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
कृषी प्रदर्शनातील प्रत्येक प्रयोगाचे मुख्यमंत्र्यांनी बारकाईने अवलोकन केले असल्याचे सांगत शरद पवार यानी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. तसेच, कृषी क्षेत्रात नवी संशोधने येत असेल, मात्र शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टी थांबवता कामा नये, असे शरद पवार यांनी सांगितले. संशोधकांनाही आता मर्यादा आल्या आहेत. शेतीच्या प्रगतीसाठी आणखी काम करणार असल्याचे सांगत यासाठी सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे असे शरद पवार यांनी सांगितले.