पुणे – पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. मात्र, यंदाही कोरोनामुळे उत्सवामध्ये रंगत कमी आली. बाप्पांचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना बंदी होती. अशाही परिस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह पुणेकरांनी कुरबुर न करता शिस्तीत आणि वेळेत पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव पार पाडला. त्यामुळे सोहळ्यात सुरक्षा योजनेच्या नियोजनासाठी पोलिसांवरही कसलाही ताण आला नाही. त्यामुळे मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो.
दरवर्षी विसर्जन मिरवणुकांचा दणदणाट असतो. शिस्तबद्ध पारंपारिक ढोल-ताशा पथकांपासून तरुणाईला डोलायला लावणार्या डीजेंपर्यंत सर्वकाही मिरवणुकांमध्ये दिसून येते. त्याचबरोबर मिरवणुका अनुभवण्यासाठी देशभरातून लोक पुण्यात येतात. त्यामुळे शहरातील मिरवणूक मार्ग भाविक आणि हौशी पर्यटकांच्या तुडूंब गर्दीने फुलून गेलेला असतो. यंदा मात्र, कोरोनामुळे बाप्पांसाठी असलेली भाविकांची गलबल गतवर्षी प्रमाणेच होती. राज्य शासनासह महापालिका आणि पुणे पोलिसांच्या आवाहनाला पुणेकरांनी शिस्तीची साद घातली.
बाप्पांची विसर्जन मिरवणुक नसल्यामुळे सारे कसे साधेपणाने, शिस्तीत आणि पर्यावरणाची काळजी घेऊनच होते. त्यामुळे पुढल्या वर्षी गणेशोत्सव प्रचंड उत्साहाने, पण अशाच शिस्तीने, इकोफ्रेन्डली पद्धतीने साजरा होऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या. – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे