प्रकाश चिखले
कोल्हार खुर्द – सध्या करोनाने देशाला ग्रासले आहे, याचा परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीवर मोठया प्रमाणावर झाल्याचे जाणवत आहे. देशाचे आर्थिक नुकसान भरून काढण्याकरिता अनेक उपाययोजना शासन राबवत आहे. शैक्षणिक क्षेत्रात शासनाने राबवलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा अनेक विद्यार्थी फायदा घेत असले तरी ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी मात्र स्मार्ट फोन नसल्याने या शिक्षणापासून वंचितच असल्याचे दिसत असल्याने त्यांच्या पुढील शिक्षणाचा मोठा प्रश्न सध्या पालकांसमोर उभा आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शालेय विद्यार्थ्यांना स्मार्ट फोनवरून शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू आहे. त्यानुसार शाळेच्या वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांचे समूह तयार करून आपल्या पाल्याचा अभ्यास घेण्याच्या सूचना देत आहेत. मात्र यामध्ये सगळेच विद्यार्थी मोबाईलवर आलेला अभ्यास सोडवत नाहीत, त्यामुळे शिक्षकांकडून पालकांनाच आपल्या पाल्याचा अभ्यास घेण्याची सक्ती होत आहे. सर्वच पालकांना मुलांसाठी वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासापासून लांबच असल्याचे दिसते.
त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील गोरगरीब स्मार्ट फोन नाहीत, अनेक कुटुंब आपल्या उदरनिर्वाहसाठी दिवसभर कष्ट करतील तेंव्हाच खातील अशी परस्थिती आजही ग्रामीण भागात आहे. मात्र तरीही माझा मुलगा शिकून मोठा व्हावा, आणि माझ्यावर आलेले वाईट दिवस त्याला येऊ नयेत या आशेने आपल्या पाल्याला शाळेची गोडी लावीत आहेत. गोरगरिबांची अनेक मुले आभ्यासात हुशार देखील आहेत. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या कौशल्याने चमकेलेले विद्यार्थी ग्रामीण भागात आहेत. मात्र, आता केवळ घरात स्मार्ट फोन नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अभ्यासक्रम दिला जातो. लॉकडाऊनमुळे जवळपास दोन महिन्यापासून विद्यार्थी शाळेपासून दुरावलेले आहेत. ऑनलाईन अभ्यास दिल्याने अनेक मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन दिलेला अभ्यास पूर्ण करावा. तसेच शासन नियमानुसार विद्यालये सुरू झाल्यानंतर पुन्हा सुरुवातीपासून अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे.
शशिकांत सोनवणे, प्राचार्य, न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बुद्रुक