भाषामंत्र्यांच्या निर्देशाकडे दुर्लक्ष : मराठीचा अनिवार्य वापर कागदावरच
पिंपरी – मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास व्हावा या हेतूने राज्य सरकारने सरकारी कामकाजात मराठी भाषेचा वापर अनिवार्य केला आहे. त्याचप्रमाणे, दुकाने तसेच कार्यालयांवर मराठी फलक नसतील तर कामगार विभागाने कारवाई करावी, असे निर्देश मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिलेले आहेत. तरीही शहरातील बऱ्याच दुकानांवर अद्यापही इंग्रजी भाषेतच पाट्या झळकत आहेत.
कामगार विभागाने दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेतून आहेत का याची तपासणी करावी. विशेषत: दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांवर व आस्थापनांवर मराठीत पाट्या नसतील तर त्यांना मिळणारी सूट बंद करण्यासाठी नियमात बदल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पिंपरी बाजारपेठेत बऱ्याच दुकानांवर इंग्रजी भाषेत पाट्या आढळल्या.
काही दुकानांवर इंग्रजीबरोबरच मराठीतूनही पाट्या असल्याचे पाहण्यास मिळाले. विशेष म्हणजे मराठीतील पाट्या छोट्या अक्षरात टाकण्यात आलेल्या आहेत. केवळ निर्देशांचे पालन करावयाचे म्हणून केलेली ही केवळ औपचारिकता दिसून येत आहे. चिंचवडगावातही काही प्रमाणात इंग्रजीतील पाट्या आढळल्या. काही दुकानांवर केवळ मराठीत पाट्या होत्या. तर, काही दुकानांवर इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेत पाट्या असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
कामगार विभागाच्या कारवाईची प्रतीक्षा
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये कामगार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यास इंग्रजी पाट्यांचे मोठे प्रमाण आढळेल. त्यामुळे याबाबत आता कामगार विभागाकडून तपासणी मोहीम राबवून कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक आहे.
तर इंग्रजी पाट्यांना काळे फासू…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषा संवर्धनाची भूमिका नेहमीच घेतली आहे. दुकानांवर मराठी पाट्या असाव्या, यासाठी मनसेने यापूर्वी इंग्रजी पाट्या उतरविणे, इंग्रजी पाट्यांवर काळे फासणे अशाप्रकारे आंदोलन केलेले आहे. मराठीला प्राधान्य न दिल्यास यापुढील काळातही लवकरच मनसेकडून मराठी पाट्यांसाठी अशाच प्रकारचे आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी दिला आहे.