आयडिया, वोडाफोनचा टॉवर्स अपग्रेडचा दावा फोल?
पुणे – गेल्या महिनाभरापासून ग्राहकांना आयडिया व वोडाफोनचे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व टॉवर्स अपग्रेड झाल्याचे संदेश आहेत. मात्र, अद्यापही आयडिया व वोडाफोनचे ग्राहक नेटवर्क कनेक्शनमधील अडथळ्याने त्रस्त आहेत. परंतु, या दोन कंपन्यांनी फोर-जी नेटवर्क देण्यासाठी व्हाईस आणि डेटा सेवेचे ऑप्टीमाईस करत असल्याचा दावा केला आहे. याबाबत या कंपनीकडून ग्राहकांना त्या प्रकारचे “एसएमएस’ पाठवण्यात आले असून नेटवर्कमध्ये अडथळे आल्यास काही दिवस सहकार्य करण्याची विनंतीही कंपन्यांनी केली आहे.
गेल्या वर्षी या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी ग्राहकांना दोन्ही कंपन्यांनी नेटवर्कमध्ये मोठे बदल करून चांगल्या प्रकारचे नेटवर्क आणि हायस्पीड इंटरनेट देणार असल्याचे सांगितले.
या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातही टॉवर्सची संख्या वाढविण्यात आल्याचा दावा केला. मात्र, मागील चार ते पाच महिन्यांपासून नेटवर्कमध्ये सतत अडथळे येत आहेत. हायस्पीड प्रक्रियेसाठी व नेटवर्कमधील अडथळे दूर करण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन कंपनी अजून किती दिवस वाट पहावी लावणार? हा ग्राहकांना पडलेला प्रश्न आहे.
गेल्या महिन्यापासून “आयडिया ग्राहकांनी लवकरच फोर-जी अनुभव घेण्यासाठी तयार व्हा’ अशा प्रकारचे संदेश येत आहेत. मात्र, प्रत्यक्षात नेटवर्कमधील अडथळ्यांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे ग्राहकांची संख्या कमी होण्याची शक्यता असल्याचे प्रमोद जगताप या ग्राहकांनी सांगितले आहे.