धनकवडी, (धीरेंद्र गायकवाड) दि. 22 -पुणे महापालिका हद्दीत सध्या डेंग्यू आणि डेंग्यूसदृश्य तापाने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: कात्रज-धनकवडी भाग या आजाराचा हॉटस्पॉट ठरत आहे. घरोघरी ताप, अशक्तपणा, हुडहुडी भरणे, सर्दी अशी लक्षणे असलेले नागरिक दिसून येत आहेत. तर, अशा वेळी तपासणी करून धूर फवारणी करण्याची मागणी होत असताना पालिकेची यंत्रणा मात्र थंड असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
कात्रज, धनकवडी, आंबेगाव पठार क्षेत्रीय परिसरामध्ये सोसायटी, कॉलनी, बैठी घरे, चाळ या ही दाट लोकवस्तीचा भाग आहे. येथे सध्या ताप आणि तशा लक्षणांचे अधिक रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, येथील 15 वर्षीय मुलीचा डेंग्यूसदृश्य तापाने मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी सकाळी आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आणि येथे फवारणी करण्यात आली. त्यामुळे डेंग्यू आणि तशा आजारांबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
सध्या पालिकेत प्रशासकराज असून सगळ्या प्रभागांमध्ये समस्यांबाबत सावळा गोंधळ सुरू आहे, असा आरोप नागरिक करत आहेत. करोनानंतर आता सर्व ठीक होत असताना डेंग्यूसदृश्य व मलेरिया तापाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.
डेंग्यू तापाचे रुग्ण वाढत आहेत. हे खूप धक्कादायक असून आता महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधीही नाहीत. त्यामुळे याबाबत दखल घेण्यासाठी कोणाला जबाब विचारावा? – गुरुनाथ साळुंखे, स्थानिक नागरिक
क्लिनिकमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये थंडीताप तसेच डेंग्यूसदृश्य लक्षणे दिसून येत आहेत. काही रुग्णांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स तसेच डेंग्यूची तपासणी करण्याचा सल्ला देण्यात येतोय. त्यात काही रुग्णांचा डेंग्यूबाबत रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे. – स्थानिक जनरल फिजिशियन, धनकवडी
साहेब “मीटिंग’मध्ये आहेत…
धनकवडीत 15 वर्षीय मुलीचा डेंग्यूसदृश्य तापाने मृत्यू झाला. यानंतर संबंधित अधिक माहिती आणि प्रशासकीय बाजू, उपाययोजना जाणून घेण्यासाठी “प्रभात’ प्रतिनिधीने कीटक प्रतिबंधक विभागाचे डॉ. संजीव वावरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा दिवसभर प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद देण्याचे टाळले. यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांच्याशी संबंधित व्यक्तीने “साहेब मीटिंगमध्ये आहेत’ असे सांगत अधिक माहिती देणे टाळले.