नगर – संक्रांतीनिमित्त आज शहरात ठिकठिकाणी पतंग उडवत असताना अनेक युवकांचे गळे कापले गेले. तसेच अनेक पक्ष्यांनाही इजा झाल्या.
पतंगाच्या चायनीज नायलॉन मांजामुळे अरबाज शेख या 18 वर्षीय युवकाच्या हनुवटीखालील भाग कापला जाऊन त्यावर तब्बल 32 टाके घालावे लागले. महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी तब्बल दीड-दोन तास अथक प्रयत्न करून मांजामुळे कापला गेलेला भाग महत्प्रयासाने टाके घालून शिवला. सध्या या युवकावर उपचार सुरू आहेत.
अरबाज शेख हा युवक बुधवारी दुपारी 1च्या सुमारास नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या बोल्हेगाव-नागापूर रस्त्याने जात असताना पतंग उडवणाऱ्याचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला अडकला, त्याने तो काढण्याचा प्रयत्न केला. पण हनुवटीखालील भागाला तो अडकून ओढला गेल्याने हा भाग कापला गेला. जखमेतून रक्त वाहू लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्याला तेथे जवळच असलेल्या डॉ. बोरुडे यांच्या रुग्णालयात नेले.
त्यांनीही तातडीने जखम साफ करून त्यावर टाके टाकले. पण हनुवटीला अडकल्यावर मांजा ओढला गेल्याने हनुवटीच्या वरच्या भागही कापला गेला आहे. हा सर्व भाग टाके घालून शिवण्यात डॉ. बोरुडे यांचे कौशल्य पणास लागले. तसेच सिंधी कॉलनी या ठिकाणावरून जात असताना सागर घोलप या युवकाच्या गळ्याला चायना मांजा अडकला.मात्र,ते गाडी सावकाश चालवत असल्यामुळे थोडक्यात बचावले गेले.