वॉशिंग्टन : शाळेत दाखल करण्यापुर्वी मुलांना अश्लाघ्य स्पर्श (बॅड टच) ओळखायला शिकवा, असे तज्ज्ञ सांगत असले तरी निम्मे पालकही आपल्या मुलांना बॅड टच शिकवण्याच्या भानगडीत पडत नाहीत, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. प्राथमिक शाळेत जाणाऱ्या दर चार मुलांपैकी एका मुलाच्या पालकाने आम्ही मुलांशी याबाबत अद्याप बोलायला सुरवात केली नसल्याचे सांगितले आहे. मिशिगन विद्यापीठात सीएसमॉट चिल्ड्रन्स हॉस्पिटलने याबाबत एक देशव्यापी सर्वेक्षण घेतले होते.
दोन ते नऊ वयोगटातल्या एक हजार 106 पालकांनी यात सहभाग घेतला होता. या वयात मुलांना समजेल, अशा भाषेत याची जाणीव करून द्या, असे मॉट पोलच्या सह संचालिका सराह क्लर्क यांनी म्हटले आहे. दर पाच पालकांपैकी तीन पालक याबाबत मुलांशी बोलण्याचे मान्य केले आहे. मात्र शाळेत जाण्याआधी मुलांशी याबाबत बोलण्यास अनेक पालकांनी नकार दिला. तब्बल 71 टक्के पालकांना असे काही सांगण्यासाठी आपले पाल्य खूपच लहान असल्याचे वाटते. अनेक पालकांनी हे संभाषण कसे करावे याबाबत मदत मागितली. अयोग्य स्पर्शाबाबत मुलांशी कसे बोलावे याची माहिती अथवा मार्गदर्शन आपल्याला मिळाले नसल्याचे पाच पैकी दोन लोकांनी सांगितले.
या बाबतची माहिती पालकांना त्यांच्या वैद्यकीय सल्लागारांकडून मिळाली नसल्याचे एकचतुर्थांश पालकांनी सांगितले. ही माहिती मुलांना न देणऱ्या पालकांपैकी 39 टक्के पालकांनी आमच्या मुलांना अशी भीती नसल्याने ही माहिती दिली नसल्याचे सांगितले. 18 टक्के पालकांना अशी घटना क्वचित घडत असल्याने याबाबत मुलांना माहिती घेण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. त्यावरून मुलांचे लैंगिक शोषण होऊ शकते, याची पलकांना जाणीव नसल्याचे स्पष्ट होते. 18 वर्षाआधी दर चारपैकी एका मुलीला तर सहा पैकी एका मुलाला लैंगिक शोषणाला बळी पडावे लागते. त्यामुळे पालाकंनी आपल्या मुलांना शाळेत जाण्यापुर्वी त्यांच्या शरीराच्या अवयावाची योग्य नावे शिकवावीत. आणि ते खासगी का आहेत ते सांगावे, असे संशोधकांनी म्हटले आहे.