राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वाचविले अनेकांचे प्राण

-ज्ञानेश्वर फड

पुणे – कोरोना महामारीमुळे पुण्यासह एकुणच महाराष्ट्रात होत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या आजी-माजी स्वयंसेवकांनी मिळुन रक्तदान आणि प्लाझ्मादान ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड, सोलापुर, पुणे येथील मरणाच्या दारात असलेल्या रुग्णांना या स्वयंसेवकांनी वाचविले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मनोज गुंजाळ, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा सचिन ढोले आणि स्वामी रामानंद तिर्थ नांदेड विद्यापीठाचा अमोल सरोदे या तीन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी ही मोहीम सुरु केली आहे. आज या मोहीमेस संपुर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

राज्यातील विविध रुग्णालयामध्ये या मोहिमेची माहिती देण्यात आली असून रुग्णालयात जेव्हा एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासते तेंव्हा या स्वयंसेवकांना कळवण्यात येते. संबंधित रक्तगट  असलेले त्या भागातील स्वयंसेवक तात्काळ रुग्णालयात पोहोचतात आणि रक्तदान करून मरणाच्या दारात उभा असलेल्या रुग्णाचे प्राण वाचवतात.

१५ दिवसाच्या बाळाला जीवनदान

नांदेड येथील केअर हाॅस्पीटलमध्ये एका १५ दिवसाच्या बाळाच्या शरीरात पांढ-या पेशींची संख्या कमी असल्याने त्याला रक्ताची अत्यंत गरज होती. कोणत्याही ब्लड बॅंकेत रक्त उपलब्ध नव्हते. यावेळी पीपल्स कॉलेज, नांदेड येथील बी. ए. तृतीय वर्षाचा माजी एनएसएस स्वयंसेवक मधुकर शिंदे याला माहिती मिळाल्यानंतर त्यांने तात्काळ रुग्णालय गाठले आणि रक्तदान करून १५ दिवसाच्या बाळाचे प्राण वाचवले.

तसेच शनिवारी (दि. 17 ऑक्टोबर) ससुन रुग्णालयात एक महीला प्रसुत झाली. मुलगा झाला होता परंतु जन्माला येताच क्षणी तो मरण पावला. बाळाचा जन्म होताना बरेच रक्त गेले होते त्यामुळे महीला अत्यवस्थ होती. O निगेटीव्ह या रक्तदात्याची आवश्यकता होती. यावेळी स्वयंसेवक श्रीनिवास वानखेडे याला माहिती समजताच त्याने रुग्णालय गाठले आणि रक्तदान करून महिलेचे प्राण वाचवले. यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचविल्याच्या घटना आहेत.

याकरिता या स्वयंसेवकांनी गुगल फॅार्म तयार केला असुन ज्या विद्यार्थ्यांना रक्तदान करायचे आहे ते विद्यार्थी या गुगल फाॅर्म वरती स्वतःचे नाव रजिस्टर करतात. आवश्यकतेनुसार त्या त्या जिल्ह्यातील रुग्णालयातून फोन येतात. हे विद्यार्थी आवश्यक रक्तगटाला फोन करुन थेट त्या रुग्णालयात जाऊन रक्तदान करण्याचे सुचित करतात. आज यामुळे नांदेड, सोलापुर, पुणे येथील मरणाच्या दारात असलेल्या रुग्णांना या स्वयंसेवकांनी वाचविले आहे.  आत्तापर्यंत महाराष्ट्रातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी यांवर आपले नाव रजिस्टर केले असुन कोरोनाचा अनिश्चित कालावधी लक्षात घेता याकरिता जास्तीत-जास्त विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभागी होणे आवश्यक आहे.

तसेच पुण्यातील एकाच भागातील १५ ते २० लोक रक्तदान करण्यास इच्छुक असतील तर ससुन रुग्णालयाच्या मदतीने थेट रुग्णवाहीका  जागेवर पाठवुन रक्तदान करुन घेण्याची सोय देखील या स्वयंसेवकांनी केली आहे.

या रक्त आणि प्लाझ्मादान मोहीमेसाठी रासेयो राज्यसंपर्क अधिकारी डाॅ. अतुल साळुंके , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर, रासेयो संचालक डाॅ. प्रभाकर देसाई, औरंगाबाद विद्यापीठाचे संचालक डाॅ. टी.आर.पाटील, नांदेड विद्यापीठाचे संचालक डाॅ.शिवराज बोकडे अधिसभा सदस्या बागेश्री मंठाळकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

काय आहे राष्ट्रीय सेवा योजना ?

२४ सप्टेंबर १९६९ रोजी ‘राष्ट्रीय सेवा योजना’ सुरू करण्यात आली असून ‘माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी’ हे या योजनेचे बोधवाक्य आहे. देशातील सर्व महाविद्यालयात ही योजना राबविण्यात येते. दरवर्षी महाविद्यालयाकडून एखाद्या गावात हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात येते. श्रमदान करून स्वयंसेवक गावाची साफसफाई करतात तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सामाजिक जनजागृती करतात. या योजनेचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास घडवून समाजाला एक आदर्श नागरिक म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.

लातूर येथे घडलेला भूकंप, भुज येथील भूकंप, केरळमधील महापूर, बिहारमधील महापूर यांसारख्या आपत्तींमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिलेले आहे. त्यामध्ये गावाची उभारणी करणे, लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे, आवश्यक असणारे साहित्य गोळा करून वितरीत करणे, शारीरिक मदत करणे यासारखे उपक्रम हाती घेतले जातात. तसेच सांगली, कोल्हापूर आणि भामरागड या ठिकाणी आलेल्या आपत्तीत राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान वाखाणण्यासारखे आहे.

रासेयो चे खर यश म्हणजे रासेयो चे आजी माजी विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपली जबाबदारी ओळखुन समाजात ज्या गोष्टींचा तुटवडा आहे त्या गोष्टी समाजाला देण हा विचार करुन माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत रक्तदान आणि प्लाझ्मा दान या मोहीमेत हे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. या योध्यांमुळेच सामाजिक जाणिव निर्माण होत आहे. हे रासेयोचे महत्त्वाचे काम आहे. अशी प्रतिक्रिया डाॅ. अतुल साळुंके
(राज्यसंपर्क अधिकारी रासेयो महाराष्ट्र शासन) यांनी दिली आहे.

रासेयो स्वयंसेवक नेहमीच समाजाभिमुख काम करीत असतात. रक्तदान आणि प्लाझ्मा दान ही मोहीम त्याचाच एक भाग असुन यामुळे आत्तापर्यंत अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत झाली आहे. मला वाटत कोरोना महामारीच्या काळात रासेयो स्वयंसेवकांचे हे काम निश्चितच कौतुकास पात्र आहे.अशी प्रतिक्रिया कुलगुरू  डाॅ. नितीन करमळकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) यांनी दिली आहे.

रक्तदान नाव नोंदणीसाठी गुगुल फाॅर्म लिंक –
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdx-Ea6_Ox2yTD8ezhHdaQfyyToa1iJOObETD-MNqSrPDayMA/viewform

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.