अनेक नेते भाजपा सोडण्याच्या तयारीत; शेतकरी नेते टिकैत यांचा दावा

नवी दिल्ली – निदर्शनस्थळ खाली करण्याची मागणी करत शुक्रवारी जोरदार दगडफेक करून शेतकऱ्यांचे तंबूची नासधूस स्थानिक नागरिकांनी सुरू केल्याने दिल्ली सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली. सुरक्षा दलांने निदर्शकांवर पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला. अश्रुधुराची नळकांडी फोडली.  त्यानंतर शेतकरी आंदोलनातील दोन प्रमुख संघटनांनी माघार घेत आंदोलनातून बाजूला होत असल्याचे जाहीर केले. याच गोंधळादरम्यान भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता व शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

नरेश टिकैत म्हणाले कि, मला आज अनेक भाजपा नेत्यांचे फोन आले. त्यांनी आम्ही सुद्धा राजीनामा देत आहोत असे मला सांगितले आहे. पक्षात राहून अशाप्रकारे आम्ही शेतकऱ्यांचा अपमान पाहू शकत नाही. अजूनही आम्ही गप्प राहिलो तर येणारी पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही, असे हे नेते म्हणाले, असा दावा त्यांनी केला आहे. यानंतर  राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

तसेच, आज सकाळपासूनच गावांमधून ट्रॅक्टर निघण्यास सुरुवात झाली. गाझीपूर सीमेवर आज कालपेक्षा अधिक शेतकरी पोहचणार आहेत, असेही टिकैत यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्लीच्या सीमांवर आंदोलनांत सहभागी होण्यासाठी हरियाणातून शेकडो शेतकऱ्यांनी कूच केले आहे. शेतकरी नेत्यांवर कारवाई करून आमचे आंदोलन कमजोर करता येणार नसल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, गाझीयाबाद प्रशासनाने उत्तर प्रदेशाच्या सीमांवर सुरू असणारे निदर्शनाच्या जागा खाली करण्याची नोटीस गुरुवारी बजावली. तर दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांवर लुकआऊट नोटीस बजावली आहे.

जिंद, रोहतक, कैथअल, हिसार भिवनी आणि सोनिपत येथून शेकडोच्या संख्येने शेतकरी टिकरी, सिंघू आणि गाझियाबाद सीमांवर रवाना होत आहेत, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा बांध गुरुवारी फुटला. हे सरकार कायदे रद्द न करून शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.