कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार लवकरच राजीनामा देतील

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ः 220 जागा निवडून आणण्याचा निश्‍चय

सोलापूर – राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसमधील अनेक आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून लवकरच ते राजीनामे देऊन भाजपमध्ये दाखल होतील, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच चंद्रकांत पाटील सोलापुरात आल्यानंतर बोलत होते. यावेळी विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, शहर प्रमुख विक्रम देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले.भाजपमध्ये प्रवेश करण्यास राज्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात आहेत. योग्य वेळ आल्यानंतर त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तत्पूर्वी असे इच्छुक आमदार आपले राजीनामे सादर करतील, नंतर त्यांना भाजपात घेतले जाईल. राजीनामे सादर करणाऱ्या आमदारांची नावे लवकरच पुढे येतील, असेही ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्यातील असे आमदार संपर्कात आहेत का, असे विचारले असता महसूलमंत्री पाटील म्हणाले, बरेच जण आहेत. त्यांची नावे आत्ताच सांगता येणार नाहीत. अशा आमदारांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यास निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले की योग्य वेळ आल्यानंतर सर्वांना न्याय दिला जाणार आहे. कोणावर अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. निवडून येण्याची क्षमता पाहूनच पावले उचलली जात आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही 7 उमेदवार बदलले. ते सर्व जण निवडून आले. विधानसभेसाठी 220 जागा निवडून आणायच्या निश्‍चयाने आम्ही रचना करीत आहोत.

भाजप-सेना युती होईल का, असे विचारले असता ते म्हणाले की आमचं ठरलेलं आहे. मात्र काय ठरलं आहे, हे फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच माहिती आहे. लवकरच तो फॉर्म्युला बाहेर येईल आणि यशस्वी होईल. जिथे स्थानिक आमदार आहे, ती जागा त्याच पक्षाला राहील. इतर जागावाटपाबाबत लवकरच निर्णय होईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)