मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक बडे नेते पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेच्या रडारवर होते अशी बातमी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या सूत्रांच्या हवाल्याने एका विश्वासार्ह माध्यमाने दिली आहे. केवळ इतकेच नाही तर संघाचे नागपूर येथील मुख्यालयही पीएफआयच्या निशान्यावर असल्याचे त्यात म्हटले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांनी गेल्याच आठवड्यात देशभरात अनेक ठिकाणे छापे घालून पीएफआयच्या शंभरपेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. सूत्रांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले की संघाचे मुख्यालय निशान्यावर आहे. दसऱ्याच्या दिवशी संघाचे राज्यभरात विविध कार्यक्रम असतात. त्या दिवशी संघाच्या नेत्यांवर लक्ष ठेवण्याची पीएफआयची योजना होती.
दरम्यान, गेल्या आठवड्यातील छाप्यांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, एनआयएचे महासंचालक, गृहसचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व स्थितीचा आढावा घेतला आहे.