देस एक पगडी अनेक

भारतात प्रत्येक भागात कोणत्या ना कोणत्या प्रकारचं शिरस्त्राण वापरलं जातंच. फक्‍त त्याचं नाव आणि बांधायची किंवा घालायची पद्धत वेगवेगळी आहे. हे सगळं एकाच ठिकाणी पाहायचं असेल तर उदयपूरला “बागोर की हवेली’ नावाचं अनोखं पगडी संग्रहालय आहे, तिकडे एकदा तरी जाऊन यायलाच हवं. मजेची गोष्ट म्हणजे इथे जगातली सर्वात मोठी 151 फूट लांब कापडापासून तयार केलेली 30 किलो वजनाची पगडी आहे.

या पगडीतही अनेक प्रकार आहेत. मूळ पगडी 82 इंच लांब आणि 8 इंच रूंद कपड्याची असते. पण त्याच्यापेक्षा लहान असलेला साफा बऱ्यापैकी कमी लांबीचा पण पगडीपेक्षा रूंद असतो. आपण राजस्थानात गेलो तर अजूनही जवळपास प्रत्येकच वृद्ध माणसाच्या डोक्‍यावर पगडी दिसतेच. आपण जेव्हा तिथली लोककला पाहतो तेव्हा “केसरीया बालमा, आवोनी, पधारो म्हारो देस रे, पधारो म्हारो देस…’ असं खड्या आवाजात म्हणत हातात एकतारी घेतलेले आणि डोक्‍यावर बांधणीची पगडी घातलेले कलाकार तर हमखास दिसतात! या भागात पगडीला “तुर्बान’ म्हणतात.

तर पंजाबमध्येही ही बांधणीची पगडी दिसते आणि त्याच बरोबर दबका प्रकारची नक्षी असलेले, मधोमध वरती कागदाच्या पंख्यासारखा तुरा असलेले आणि मागे लांब शेमला सोडलेले पंजाबी पुत्तर पाहिले की आत्ता हे बल्ले बल्ले करत भांगडा सुरू करतील की काय असाच भास होतो. पंजाबी पगडीवर मराठी गायकवाड घराण्याच्या किंवा शिंदेशाही पगडीवर जसा ब्राऊच असतो तसा याही पगडीवर ब्राऊच असतो. त्याला “कलगी’ असं म्हणतात. कदाचित ही “कलगी’ पगडीच्या एकावर एक घड्या नीट बसवण्यासाठी वापरत असावेत. शीख लोक जी पगडी घालतात तिला “दस्तर’ म्हणतात. आजही खालसा लोक ही पगडी घालतात. ही पगडी आपल्याला आता आलेल्या अक्षयकुमारच्या “केसरी’ सिनेमात पाहायला मिळते. बिहारच्या मिथिलानगरी भागात जी पगडी वापरतात तिला “पाग’ म्हणतात. तर दक्षिणेकडे म्हैसूर आणि कोडगू भागातले राजे जी पगडी घालायचे तिला “पेटा’ म्हणतात. हा “पेटा’ रेशीम आणि जरीचा तयार केलेला असतो. आजही तिथे मान्यवरांचं स्वागत हा पेटा बांधूनच करण्याची पद्धत आहे.

“राधाकृष्णन पेशावरी’ पगडीमध्ये डोक्‍यावर आधी “कुल्ला’ नावाची टोपी घालून नंतर त्यावर पगडी बांधायची पद्धत आहे. या पगडीला “लुंगी’ म्हणतात. तर मुसलमानांमध्ये उंच गोल टोपीभोवती तलम कापडाचा पट्टा बांधून त्याची पगडी बांधली जाते. मुघल काळातल्या बादशहांच्या आणि इतर राजांच्या पगड्या अतिशय उंची कापडाच्या असायच्या.
पगडीचा विचार करताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे पगडी ही काही फक्‍त डोकं झाकण्यासाठी तयार झालेला वस्त्र प्रकार नाही. पूर्वीच्या काळी सगळेच चालत प्रवास करत होते. तेव्हा आजच्यासारखी जागोजागी खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या सोयी नसायच्या. तेव्हा हीच लांबलचक पगडी वाटसरूंना घटकाभर झाडाखाली झोपताना उशीचं काम करायची. तर कधी गरज पडेल तेव्हा हेच पांघरुणही व्हायचं आणि दिवस उजाडला की उठून नदीत आंघोळ केली की हीच पगडी टॉवेलचंही काम करायची. आणि वेळ पडली तर ही पगडी मोठ्या दोराचंही काम करायची. नदीतलं पाणी गढूळ असेल तर याच पगडीच्या तलम कापडानं ते गाळून पिण्याची पण युक्‍ती करता यायची अशी ही पगडी बहुपयोगी होती. पण काम झालं की तिला हातात घेऊन वागवायला नको म्हणून ती डोक्‍यावर बांधून टाकायची आणि बाकीचं सामान घ्यायला हात मोकळे ठेवायचे… किती मल्टीटास्किंग होती न पगडी आणि डोकं वापरून तिचा उपयोग करणारे आपले पूर्वजही?
तरीही शेवटी पगडी प्रत्येक प्रदेशाची आन, बान आणि शान होती आणि आजही आहे. त्याच संदर्भात दुर्गादासाचा एक दोहा प्रसिद्ध आहे… जननी सूत ऐसो जने जैसो दुर्गादास, बांध मुंडासा रखियो बिनधरती बिनआकास… मातेनं दुर्गादासासारख्या अशा पुत्राला जन्म द्यावा की त्याच्या पगडीचा पृथ्वीवरच नाही तर स्वर्गातही मान राखला जाईल!

अमृता देशपांडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.