गुड न्यूज : चार महिन्यांनंतर निर्देशांकांत भरीव वाढ
नवी दिल्ली – सोमवारी राष्ट्रीय उत्पन्न 23.9 टक्क्यांनी कोसळल्याची आकडेवारी जाहीर झाली असतानाच जुलै महिन्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता पूर्वपदावर आली आल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. यामुळे सरकार आशावादी झाले आहे.
जुलै महिन्याचा पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स म्हणजे पीएमआय चार महिन्यांनंतर प्रथमच 50 अंकांच्या वर जाऊन 52 इतका नोंदला गेला आहे. निर्देशांक 50 पेक्षा कमी असेल तर या क्षेत्राची उत्पादकता कमी होत आहे असे समजले जाते.
तर हा निर्देशांक 50 च्या वर असेल तर या क्षेत्राची उत्पादकता वाढत आहे, असे समजले जाते. जुलै महिन्याच्या अगोदर चार महिने लॉकडाऊनमुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता 50 च्या खाली होती. मात्र, जुलै महिन्यामध्ये ती 52 नोंदली गेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ही उत्पादकता आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्यांनी सांगितले. यासाठी केंद्र सरकारने लघु उद्योगांना भांडवली मदत दिली आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.
सेवा क्षेत्राची उत्पादकताही वाढणार
सेवा क्षेत्राची उत्पादकताही जुलै महिन्याच्या अगोदर 50 अंकाच्या खाली आहे. त्या क्षेत्राच्या उत्पादकतेची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. करोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राप्रमाणेच सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढण्याची शक्यता आहे. उत्पादन सुरू करण्यास जास्त अडचणी असतात. मात्र, सेवा क्षेत्रातील काम त्या तुलनेमध्ये लवकर सुरू होऊ शकते. त्यामुळे जुलै महिन्याचा सेवा क्षेत्राचा पीएमआय 50 च्या जवळपास जाईल, असे विशेषज्ञांना वाटते.