नवी दिल्ली – राष्ट्रपती भवनामध्ये आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपतींनी विशेष कामगिरी पार पाडणाऱ्या ५ ते १८ वयोगटातील ४९ मुला-मुलींना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारने सन्मानित केलं.
दरम्यान, पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्यांच्या यादीत भारताची १७ वर्षांखालील स्टार नेमबाज मनू भाकर हीचा समावेश करण्यात न आल्यानं तिचे वडील रामकिशन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, मेक्सिको येथील आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेद्वारे वयाच्या १६व्या वर्षी नेमबाजीस सुरुवात करणाऱ्या मनू भाकरने या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. तिच्या या कामगिरीमुळे ती भारताची विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली होती. यांनतर देखील मनू भाकरने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. मात्र असं असताना देखील तिला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित न केल्यानं तिच्या वडिलांनी या पुरस्काराच्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
मनू भोकरचे वडील रामकिशन यांनी याबाबत बोलताना, “राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं जिंकल्यानंतरही जर मनू भोकरला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात येत असेल तर निश्चितच हे पुरस्कार देण्यासाठी कोणते निकष तपासले जातात हे पाहणं गरजेचं आहे.” असं वक्तव्य केलं.