आशियाई क्रीडास्पर्धेत सोनेरी कामगिरीसाठी मनू भाकर सज्ज

संग्रहित छायाचित्र...

टीकेकडे दुर्लक्ष करून सर्वोत्तम कामगिरीसाठीच प्रयत्न

नवी दिल्ली: भारताची अग्रगण्य युवा नेमबाज मनू भाकर आगामी आशियाई आणि जागतिक स्पर्धांमध्ये आपली सोनेरी कामगिरी अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने तयारीला लागली असून आगामी स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकण्याच्याच दृष्टीने तयारीला लागल्याचे तिने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आशियाई क्रीडास्पर्धेची तयारी करणारी मनू पत्रकारांशी बोलताना म्हणाली की, मला आगामी आशियाई आणि जागतिक अजिंक्‍यपद नेमबाजी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवायची आहे, या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने सध्या माझी कसून तयारी सुरू असून सध्या तरी मी पदकाच्या दृष्टीने विचार न करता स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीच्या दृष्टीने विचार करत आहे. तसेच या जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या स्पर्धा असल्याने माझ्यावर काही प्रमाणात दडपण आहे. मात्र, खेळाडूंवर सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच दडपण असते. त्यामुळे मी या दडपणाचा कामगिरीवर परिणाम होऊ देत नाही.

केवळ 16 वर्षीय मनूने विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत आपल्या गटात सुवर्णपदक कमावून आपल्यातील गुणवत्ता सर्वांसमोर आणली होती. त्यामुळे आगामी आशियाई स्पर्धांमध्ये मनूला 10 मीटर एअर पिस्टल, 25 मीटर स्पोर्टस पिस्टल व मिक्‍सड एअर पिस्टल या तीन स्पर्धांमध्ये भारतीय चमूचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, तीन वेगवेगळ्या गटांतून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याने तिच्या निवडीबाबत वाद उद्‌भवला आहे. तिच्या या निवडीबाबत भारताची स्टार खेळाडू हीना सिधू हिनेही भारतीय नेमबाजी संघटनेवर टीका केली असून, संघटना केवळ आपल्या मर्जीतील खेळाडूंची निवड करत असून बाकी खेळाडूंकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही तिने केला आहे.

या सगळ्या घटनाक्रमाबद्दल बोलताना मनू म्हणाली की, मला या टीका अथवा टिप्पणीसंदर्भात काही देणे घेणे नाही. मला केवळ आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि त्यातही वैयक्‍तिक पदकाबरोबरच देशाला यश मिळवून द्यायचे आहे. संघटनेने मला तीन गटांसाठी निवडले काय किंवा एका गटापुरते निवडले काय, मला काहीच फरक पडत नाही. वादाकडे दुर्लक्ष करण्याचे महत्त्व मला माहीत आहे. अशा गोष्टींचा माझ्या कामगिरीवर परिणाम होणार नाही, याकडे मला लक्ष द्यायचे आहे.

मनू भाकरची वाटचाल

वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मनू भाकरने मार्शल आर्टस, टेनिस व स्केटिंगसारख्या खेळांमध्ये चमकदार कामगिरी करताना राष्ट्रीय स्तरावर पदकेही जिंकली होती. त्यानंतर मरीन इंजिनियर असलेल्या तिच्या वडिलांच्या प्रेरणेमुळे मनूने नेमबाजीत रस घेतला. तिच्या वडिलांनी त्यासाठी सुमारे दीड लाख रुपयांची गुंमतवणूकही केली. परंतु मनूने त्यांचे प्रयत्न वाया जाऊ दिडले नाहीत. तिने 2017 आशियाई ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक जिंकून सुरुवात केली. त्यानंतर 2017 राष्ट्रीय स्पर्धेत हीना सिधूला पराभूत करून खळबळ उडवून दिली. या स्पर्धेत मनूने तब्बल 9 सुवर्णपदके जिंकली. त्यानंतर 2018 ग्वाडालजारा विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत मनूने थेट सुवर्णपदकाचाच वेध घेतला. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सोनेरी यशाची पुनरावृत्ती करून तिने आशियाई स्पर्धेतील यशाबद्दल आशा उंचावल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)