Paris Olympic 2024 (Closing Ceremony, Manu Bhaker) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करून भारतासाठी दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर समारोप समारंभात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचणारी मनू रविवारी समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक असेल. दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने अद्याप पुरुष ध्वजवाहकाचे नाव जाहीर केलेले नाही.
मनूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले. अशाप्रकारे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली. यानंतर तिने सरबज्योत सिंगसोबत 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये मिश्र सांघिक स्पर्धेतही कांस्यपदक पटकावले.
पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर भारताची ध्वजवाहक असेल. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, होय मनूची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. तिने चमकदार कामगिरी केली आहे आणि त्यामुळे ती या सन्मानास पात्र आहे.
हरियाणाच्या या 22 वर्षीय नेमबाजाने यापूर्वी असे सांगितले होते की, भारताचा ध्वजवाहक होणं ही एक सन्मानाची बाब आहे. मनूने पीटीआयला सांगितले होते की, “भारतीय संघात असे बरेच खेळाडू आहेत जे अधिक पात्र आहेत पण मला तसे करण्यास सांगितले गेले तर हा खरा सन्मान होईल.”